‘जगभरातील विविध संकटे आणि संघर्षांचा अन्न, इंधन आणि खतांच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात लक्ष्य केले जात असलेल्या व्यापारी जहाजांची आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जावी,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत (ईएएस) मंगळवारी केले. पूर्व आशिया शिखर परिषद सदस्य देशांमधील संयुक्त प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोदी यांनी ‘ सीफेरर्स सेफ्टी इनिशिएटिव्ह ’ या उपक्रमाचीही घोषणा केली. सागरी सुरक्षा आणि मुक्त नौवहन सुनिश्चित करणे हे समुद्रांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मनिला येथे पूर्व आशिया शिखर परिषद पार पडली. युक्रेन आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत सर्व प्रयत्नांना पाठिंबा देत असल्याचेही मोदी यांनी यामध्ये बोलताना सांगितले.‘आपले समुद्र हे सामायिक समृद्धीचे जीवनवाहक आहेत. त्यांची सुरक्षा आणि मुक्त नौवहन सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी आम्ही ‘सीफेरर्स सेफ्टी इनिशिएटिव्ह’ सुरू करीत आहोत. या माध्यमातून संयुक्त प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेतील सहकार्य वाढविण्यात येईल,’ असे मोदी म्हणाले. व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.