दिवाळी अन् सणासुदीचा हंगाम संपताच सर्वसामान्यांच्या बजेटवर महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती पुन्हा वाढविण्याच्या तयारीत आहेत.
पाकिटे छोटी होणार?‘फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ अर्थात ‘एफएमसीजी’ क्षेत्रातील कंपन्यांवर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा दबाव आहे. मागील तिमाहीत रिफाइंड पाम तेल, साखर, दूध आणि पॅकेजिंग लेमिनेट्सच्या किमतींमध्ये सात टक्क्यांपर्यंत वाढ झाली. वाढलेल्या खर्चाचा काही भाग ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी कंपन्या आता किमती वाढविण्याच्या तयारीत आहेत. बिस्किटे, खाद्यतेल, मीठ, सॉस आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. काही उत्पादनांच्या किमती थेट वाढविण्याऐवजी त्यांचे वजन कमी केले जाऊ शकते.
सणांनंतरच दरवाढ का?
गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचे अप्लायन्सेस व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांच्या मते, उत्पादकांनी सणासुदीचा हंगाम संपेपर्यंत दरवाढ जाणीवपूर्वक रोखून धरली होती. ग्राहकांची मागणी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी वाढलेल्या उत्पादनखर्चाचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला नव्हता. यापूर्वी सप्टेंबरमध्ये उद्योगाने विविध उत्पादन श्रेणींमध्ये किमती वाढवल्या होत्या. आर्थिक वर्ष २०२७च्या पहिल्या सहामाहीत कमॉडिटीच्या वाढलेल्या किमतींमुळे बहुतांश सूचिबद्ध ग्राहकवस्तू कंपन्यांच्या नफ्याच्या प्रमाणावर दबाव आला. आता वाढीव खर्च ग्राहकांकडे हस्तांतरित करून नफाक्षमता सुधारण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.
दरवाढीमागील कारणे
एआयमुळे मेमरी चिप्स महाग
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) पायाभूत सुविधांची मागणी वाढल्यामुळे मेमरी चिप्सचा पुरवठा कमी पडत आहे. परिणामी स्मार्टफोन आणि टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या वाढीचा परिणाम आगामी काळात ग्राहकांच्या खरेदीवर दिसू शकतो.
कच्च्या मालाचा भार
फ्रिज आणि इतर घरगुती उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींबरोबरच मालवाहतुकीच्या वाढलेल्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या किमती १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागडा कच्चा माल
खाद्यतेल, साखर, दूध आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमती वाढल्याने ‘एफएमसीजी’ कंपन्यांचा उत्पादनखर्च वाढला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी दरवाढीसोबतच उत्पादनाचे प्रमाण कमी करण्याचा पर्याय निवडत आहेत.
इलेक्ट्रॉनिक वस्तू महागर?
आगामी सात ते १० दिवसांत इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणारे बहुतांश ब्रँड्स किमती वाढवू शकतात. या दरवाढीनंतर यंदाच्या वर्षभरात स्मार्टफोनच्या किमतींमध्ये एकूण ४० टक्क्यांहून अधिक, टीव्हीच्या किमतींमध्ये २० टक्क्यांहून अधिक, तर घरगुती उपकरणांच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.