सुमारे दोन महिन्यांच्या शांततेनंतर इराणने आखाती देशांवरील हल्ले पुन्हा सुरू केले असून, मंगळवारी बहारीनमधील अमेरिकन रडार केंद्रावर ड्रोन हल्ला केला. अलीकडच्या काळातील अमेरिकन लष्करी तळांवरील हा तिसरा हल्ला आहे. दरम्यान, बहारीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ‘विश्वासघातकी इराणी हवाई हल्ले’ यशस्वीरीत्या रोखल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने ‘यूएसएस थिओडोर रूझवेल्ट’ ही विमानवाहू युद्धनौका या प्रदेशात दाखल झाल्याची पुष्टी केल्यानंतर हा हल्ला झाला. यामुळे नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.अमेरिकेने इराणच्या दळणवळण मनोऱ्यांवर केलेले हल्ले आणि ड्रोन टेहळणीला हे प्रत्युत्तर असल्याचे इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड कोअर’ने म्हटले आहे. ‘हवाई हद्दीचे उल्लंघन आणि प्रादेशिक तळांचा इराणविरोधात वापर खपवून घेतला जाणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.