मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा मंगळवारी केली. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान असताना सरकारी रेल्वे प्रकल्पातून त्यांनी आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप सत्ताधारी मंगोलियन पीपल्स पार्टीतीलच एका नेत्याने केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
देशाची राजधानी उलानबातोरचे माजी महापौर न्याम्बातर खिशगी यांनी शनिवारी खुरेलसुख यांच्यावर आरोप केले होते. तावानतोलगोई-गाशुनसुखाईत रेल्वे प्रकल्पाशी संबंधित व्यवहारातून खुरेलसुख यांना २.५ कोटी डॉलर मिळाल्याचा दावा त्यांनी केला. खिशगी हे अध्यक्षांच्या त्याच पक्षातील वेगळ्या गटाशी संबंधित आहेत. या आरोपांनंतर विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीने खुरेलसुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.खुरेलसुख यांनी मात्र गैरव्यवहाराचे सर्व आरोप फेटाळले. मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले, की महिनाभराहून अधिक काळ त्यांच्या प्रतिमेवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. तरीही आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मी माझ्या जनतेकडून किंवा माझ्या देशाकडून कधीही चोरी केलेली नाही. मी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून एक सामान्य नागरिक म्हणून राहीन,’ असेही त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१९मध्ये तावानतोलगोई-गाशुनसुखाईत रेल्वे प्रकल्पाचे कंत्राट स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता देशातील मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या ‘बोडी इंटरनॅशनल एलएलसी’ला देण्यात आले. या बदल्यात खुरेलसुख यांनी कंपनीकडून लाच स्वरूपात पैसे घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘बोडी इंटरनॅशनल’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नोकरशहांना रोख लाच दिल्याचे आरोप फेटाळले. हे आरोप बदनामीकारक असून कंपनीने कोणताही गैरप्रकार केलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
२०२१मध्ये मंगोलियन पीपल्स पार्टीला संसदेत बहुमत मिळाल्यानंतर खुरेलसुख अध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षांतर्गत कलह वाढला असून अवघ्या नऊ महिन्यांत मंगोलियात तीन पंतप्रधान पदावर आले आहेत.