पाहिले न मी तुला, तू मला पाहिले!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पाहिले न मी तुला, तू मला पाहिले!
णीसंग्रहालयाव्यतिरिक्त घुबड पाहण्याची एक संधी एकदा आली होती. संध्याकाळ आणि रात्र यांच्या मधल्या कातरवेळी मी आणि माझा चुलतभाऊ रस्त्याने चाललो होतो. दोन सोसायट्यांमधल्या रिकाम्या जागेजवळून जाताना तो अचानक म्हणाला, “अरे, ते बघ घुबड! खाली झेपावतंय. उंदराची शिकार करणार बहुतेक.” मी तिकडे पाहिले; पण नगरपालिकेच्या मंद दिव्यांत मला काहीच दिसले नाही. त्या रात्री चुलतभावाला घुबड दिसले, मला नाही. तेव्हा थोडे वाईट वाटले; पण पुढे घुबडाबद्दल माहिती झाली, तेव्हा ते का दिसले नाही, याचेच कुतूहल वाटू लागले.

घुबड हा सर्व जगभर पसरलेला विलक्षण पक्षी आहे. तो निशाचर आहे, हे सर्वश्रुत. Strigiformes या एकाच गणात मोडणाऱ्या घुबडांच्या जगभर सुमारे दोनशे-अडीचशे प्रजाती आढळतात. बर्फाळ पर्वतरांगा, समुद्रकिनारे, घनदाट जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंटे, कमी-अधिक पर्जन्यमानाचे भाग, अगदी नागरी वसाहती अशा जवळपास सर्व परिसरांत घुबड दिसते. परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे.
घुबड स्वतः घरटे बांधत नाही. झाडांच्या ढोली, गुंतलेल्या फांद्यांमधल्या पोकळ्या, डोंगरकपारी, जुन्या इमारतींचे कानेकोपरे, खिडकीवरील उतारछप्पर आणि भिंतीतील चिंचोळ्या जागा अशा ठिकाणी त्याचा निवास असतो. मुंबईत दक्षिण भागात राहणाऱ्या एका नातेवाईकाने मला घुबडाचा ठाव ओळखण्याची खूण सांगितली होती. ज्या कोपऱ्यात पांढरे मलमूत्राचे ओघळ दिसतात, तिथे घुबड असण्याची शक्यता. अर्थात, दुर्बिणीतून पाहिले तरी ते तिथे असेलच असे नाही. आम्ही पाहिले तेव्हा नेमके घुबड नव्हतेच!

घुबड शिकार करते ती संध्याकाळच्या, पहाटेच्या अंधुक प्रकाशात किंवा रात्री. या ‘अवेळी’ शिकार करण्यासाठी निसर्गाने त्याच्या शरीररचनेत अद्भुत यंत्रणा घडवली आहे. शरीराच्या मानाने घुबडाचे डोळे फार मोठे असतात. त्यामुळे अत्यल्प प्रकाशातही त्याला दिसते. डोळ्यांतील नेत्रपटलावर असलेल्या सळईसारख्या पेशी प्रकाश टिपतात; शंकूपेशी रंग व तपशील दाखवतात; तर ज्ञानतंतूंच्या पेशी हे संकेत मेंदूकडे नेतात. घुबडाच्या नेत्रपटलावर सळईपेशी आणि रेटिनल गॅन्गलियन पेशी मुबलक असल्याने अंधारातही त्याला सावजाचा मागोवा घेता येतो.

त्याचे डोळे चेहऱ्याच्या पुढच्या भागावर असल्याने समोरील वस्तूवर लक्ष केंद्रित करता येते आणि खोलीचा अंदाज येतो. पण हे डोळे कवटीच्या खोबणीत स्थिर असतात; बाजूचे दृश्य पाहण्यासाठी मान फिरवावी लागते. म्हणूनच निसर्गाने त्याची मान विलक्षण बनवली आहे. माणसाच्या मानेत सात मणके असतात; घुबडाच्या मानेत चौदा. त्यामुळे ते मान सुमारे २७० अंशांपर्यंत फिरवू शकते. घुबड मान पूर्ण ३६० अंशांत फिरवते, ही मात्र गैरसमजूत आहे. त्याच्या या विचित्र हालचालींमुळेच कदाचित घुबड अपशकुनी मानले गेले असावे.

घुबडाची श्रवणशक्ती तर अजोड आहे. हिमउल्लूक बर्फाच्या थराखाली हालचाल करणाऱ्या सावजाचा आवाज टिपू शकते. ग्रेट ग्रे आउल एक-दोन फूट बर्फाखालील उंदीर किंवा घुशीचा केवळ हालचालीच्या आवाजावरून वेध घेऊ शकते. यामागे घुबडाचा गोल चेहरा आणि ध्वनिलहरी कानांकडे वळवणारी त्याची ‘फेशियल डिस्क’ कारणीभूत आहे. त्याची चोचही गरुडासारखी पुढे आलेली नसून थोडी आत असते; त्यामुळे ध्वनीचा मार्ग अडत नाही.

आणखी आश्चर्य म्हणजे घुबडाचे दोन्ही कान सारख्या पातळीवर नसतात. उजवा कान डाव्यापेक्षा किंचित वर असतो. त्यामुळे ध्वनिलहरी दोन्ही कानांपर्यंत पोहोचण्याच्या वेळेतील सूक्ष्म फरकातून त्याला सावजाची दिशा, अंतर आणि उंची हे तिन्ही कळतात. कमी प्रकाशात पाहणारी दृष्टी आणि सूक्ष्म आवाजावरून वेध घेणारी श्रवणक्षमता हे त्याचे दुधारी शस्त्रच आहे.

यावर कडी म्हणजे त्याचे निःशब्द उड्डाण. घुबडाच्या पंखांची पिसे मऊ, लवचीक आणि कंगव्याच्या दातांसारखी दातेरी असतात. त्यामुळे उडताना हवेचे भोवरे निर्माण होत नाहीत, घर्षण कमी होते आणि आवाज जवळजवळ शून्य राहतो. सावजाला त्याची चाहूलही लागत नाही. अंधारात पाहणारी दृष्टी, अचूक श्रवणशक्ती आणि निःशब्द झेप, या तिन्हीमुळे घुबडाच्या नख्यांतून सुटणे जवळपास अशक्य ठरते.

तरीही घुबड सहज दिसत नाही. कारण ते निशाचर आहे आणि आपल्यापैकी फार थोडे लोक रात्री भटकणारे असतात. शिवाय त्याचे रंग परिसराशी मिसळून जातात. झाडी-गवताळ भागातील घुबडे हिरवट, पिवळसर, राखाडी किंवा तपकिरी दिसतात; हिमप्रदेशातील घुबडे शुभ्र असतात. ती दिसली, तरच!

गेल्या वर्षी नातेवाइकांना घेऊन जवळच्या मेट्रोपार्कमध्ये गेलो असताना घुबड दर्शनाचा योग आला. झाडीतल्या पायवाटेपासून पन्नास फुटांवर एक घुबड फांदीवर शांत बसले होते. आम्हाला त्याची कल्पना नव्हती. अचानक ब्लूजे पक्ष्यांच्या कर्कश शिट्ट्या ऐकू आल्या. ते एका फांदीभोवती घिरट्या घालत होते. नीट पाहिले, तर तिथे घुबड बसलेले होते. बहुधा ब्लूजेंचे घरटे जवळ असावे. घुबड जरी शांत होते, तरी त्याची उपस्थितीच त्यांना असह्य झाली होती. मिनिटभरात कटकटीला कंटाळून ते घुबड आवाज न करता उडून गेले. ब्लूजेंनी गोंधळ घातला नसता, तर आम्हाला ते दिसलेच नसते.

निसर्गाच्या जैविक साखळीत घुबड मध्यमस्तरावरील शिकारी पक्षी आहे. त्याच्या आहारात उंदीर, घुशी, व्होल्स, मोल्स आणि लहान पक्षी असतात. त्यामुळे ते महत्त्वाचे जैवनियंत्रक ठरते. पूर्ण वाढलेले बार्न आउल दिवसाला एक ते तीन उंदीर खाते; वर्षभरात साधारण हजार ते दीड हजार. त्यामुळे शेतातील उंदरांचे प्रमाण कमी होते. काही देशांत शेतात मुद्दाम घुबडांसाठी कृत्रिम घरटी बसवली जातात.

दुर्दैवाने घुबडांच्या अनेक प्रजाती धोक्यात आहेत. म्हणून अमेरिका, भारतासह अनेक देशांनी घुबडाला संरक्षित जीव घोषित केले आहे. घुबडाला मारणे किंवा जाणूनबुजून इजा करणे कायद्याने गुन्हा आहे.

खरे तर भारतात घुबडाचा तिरस्कार होऊ नये. कारण धन, संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मी हिचे वाहन म्हणून आपण घुबडाला मान दिला आहे. असा विलक्षण, उपयुक्त आणि गूढ पक्षी दुर्लक्षित किंवा अपशकुनी न मानता आदराने पाहायला हवा.

आणि हो, कधी तुम्हाला घुबड दिसलेच, तर लक्षात ठेवा : तुम्ही त्याला आत्ता पाहिले असेल; पण त्याने तुम्हाला खूप आधीपासून पाहिलेले असते!

(लेखक अमेरिकास्थित संगणक सल्लागार आहेत.)