आंदोलकांवर अश्रुधूर, साउंड ग्रेनेडचा वापर

Contributed by: वृत्तसंस्था,ढाका|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
polices brutal attack on bangladeshs garment workers protesters
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशातील वस्त्रोद्योग कामगारांनी मंगळवारी ढाक्याभोवतीच्या औद्योगिक पट्ट्यात तीन प्रमुख महामार्ग रोखून धरून, पोलिसांशी संघर्ष केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने एक हजारांहून अधिक निमलष्करी जवान तैनात केले असून, आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या, साउंड ग्रेनेड आणि लाठीमाराचा वापर करण्यात आला.

अन्न, घरभाडे, वाहतूक आणि आरोग्य खर्चात झालेल्या वाढीमुळे किमान मासिक वेतन १२,५०० टकावरून ३० हजार टका करावे, या मागणीसाठी ऑक्टोबरच्या अखेरीपासून हे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलकांनी ढाका-आरिचा, ढाका-टांगैल आणि ढाका-मयमनसिंग हे महामार्ग रोखल्याने वाहतूक विस्कळित झाली. आशुलिया, गाझीपूर आणि नारायणगंज येथे ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’च्या (बीजीबी) ४२ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. आंदोलनामुळे किमान ३७ कारखाने बंद ठेवण्यात आले, तर डझनभर कारखान्यांतील उत्पादन तात्पुरते थांबले. मिरपूर, सावर आणि हेमायेतपूर परिसरात टायर जाळणे, दगडफेक आणि पोलिसांशी झटापटीच्या घटना घडल्या.
वेतन सुधारणेसाठी सरकारने एक नोव्हेंबरला सहा सदस्यीय किमान वेतन मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाची १६ नोव्हेंबरची तिसरी बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ती आता २३ नोव्हेंबरला होणार आहे. नवीन वेतन रचना एक डिसेंबरपासून लागू करून जानेवारीत सुधारित वेतन देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्र निर्यातदार असलेल्या बांगलादेशच्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे. आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी आणि ऑर्डर्स रद्द होण्याची भीती कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन भडकवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी ‘बीएनपी’ नेत्यांनी केला आहे. हसीना यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.