सागरी सुरक्षेचा निर्धार

Contributed by: मनिला,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सागरी सुरक्षेचा निर्धार
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी ‘क्वाड’ देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी मंगळवारी महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा केली. सागरी देखरेख, केबल कनेक्टिव्हिटी आराखडा आणि सायबर सुरक्षा सहकार्याचा यात समावेश आहे.

शिखर बैठकीत या उपाययोजनांची घोषणा करताना नेत्यांनी विद्यमान स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या; तसेच ‘अस्थिरता निर्माण करणाऱ्या किंवा एकतर्फी कारवायांना’ तीव्र विरोध दर्शवला. ‘बळाचा वापर किंवा दबाव टाकून अशा कारवाया केल्या जाऊ नयेत,’ असेही त्यांनी म्हटले. या वक्तव्याद्वारे चीनला स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे.
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची उपस्थित होते. ‘मनमानी निर्यात निर्बंधांसह आर्थिक दबावाबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो,’ असे नेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले. इंडो-पॅसिफिकमध्ये खुले, सुरक्षित आणि लवचीक सागरी वाहतूक मार्ग सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धारही नेत्यांनी या वेळी व्यक्त केला.

‘महत्त्वाच्या पुरवठा साखळ्या सुरक्षित करणे, नौकावहन आणि हवाई उड्डाण स्वातंत्र्याचे संरक्षण करणे; तसेच विश्वसनीय कृत्रिम बुद्धिमत्तेतील गुंतवणूक आणि तैनातीसह भविष्यातील तंत्रज्ञानाद्वारे विकासाला चालना देणे यासाठी आम्ही काम करीत आहोत,’ असेही संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

‘क्वाड’ परराष्ट्रमंत्र्यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या एआय ॲक्सलरेटर निर्णयाचा उल्लेख करताना नेत्यांनी केला. ‘माहितीची देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्राविषयी जागरूकता वाढवण्यासाठी इंडो-पॅसिफिक मेरिटाइम सर्व्हेलन्स कोलॅबोरेशन या उपक्रमाचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो,’ असेही या नेत्यांनी म्हटले आहे.

मनिला येथे क्वाड देशांच्या नेत्यांच्या छायाचित्र सत्रापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमिनीवर ठेवलेला छोटा तिरंगा उचलून खिशात ठेवला. नेत्यांच्या उभे राहण्याच्या जागेची खूण म्हणून हा तिरंगा ठेवण्यात आला होता. मोदींची ही कृती पाहून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘तो जपून ठेवा’, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रसंगाचा व्हिडिओ चर्चेत आला.