आई- वडिलांच्या नात्याविषयी केलेल्या विधानावरून टीकेला सामोरे जात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि रा. स्व. संघाच्या समर्थकांवर पलटवार केला. ‘भीती, राग आणि द्वेष यांनी त्यांच्या हृदयात असे जाळे विणले आहे, की ते प्रेमाचा अनुभव घेऊ शकत नाहीत किंवा ते व्यक्तही करू शकत नाहीत,’ असे गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.
राहुल गांधी यांनी १२व्या शतकातील देवी पार्वती भगवान शिवांच्या मांडीवर बसलेली दर्शविणाऱ्या शिल्पाचे छायाचित्रही शेअर केले. ‘एक खरा हिंदू म्हणून त्यांना या जाळ्यातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे; जेणेकरून तेही प्रेम आणि आपलेपणाचे सौंदर्य अनुभवू शकतील. सत्यम् शिवम् सुंदरम्,’ असे त्यांनी नमूद केले.सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाशी संबंधित हा वाद आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला होता. ‘जेवणाच्या वेळी पापा असायचे आणि त्यांच्या मांडीवर आई बसायची,’ असे ते म्हणाले होते. या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी राहुल गांधींवर टीका केली.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टवर शेअर केलेल्या छायाचित्रावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली. राहुल यांनी हळेबिडू येथील शिल्पकलेचे छायाचित्र पोस्ट केले असून, त्यांना द्वारसमुद्र या होयसळ राजधानीला जुनी राजधानी असे का म्हटले जाऊ लागले, हा प्रश्न विचारला.