वायूप्रदूषणासाठी मी जबाबदार

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वायूप्रदूषणासाठी मी जबाबदार
‘देशात रस्ते आणि वाहनांची संख्या वाढत असतानाच प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. देशातील वायूप्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा असून, ४० टक्के वायूप्रदूषणासाठी मी स्वतःला जबाबदार मानतो,’ असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.

दिल्ली येथे झालेल्या १४व्या ‘सीआयआय बायोएनर्जी शिखर परिषदे’त ते बोलत होते. रस्ते पायाभूत सुविधांचा विस्तार, वाढती वाहनसंख्या आणि वाहन उद्योगाची झपाट्याने होणारी वाढ यामुळे प्रदूषणात भर पडत असल्याचे गडकरी म्हणाले. या समस्येवर मात करण्यासाठी इथेनॉल , हायड्रोजन, जैवइंधन , मिथेनॉल, बायोडिझेल आणि ‘एलएनजी’ आदी पर्यायी इंधनांचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जैवऊर्जेच्या क्षेत्रात मोठी क्षमता असल्याचे सांगताना गडकरी यांनी गोबरधन योजनेंतर्गत सुमारे ३,००० प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती दिली. त्यापैकी २५० प्रकल्पांचे काम सुरू केले आहेत, असेही ते म्हणाले. ऊर्जेची आयात कमी करणे, इंधन स्वस्त करणे, प्रदूषणमुक्त पर्याय विकसित करणे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, ही सरकारची ऊर्जा धोरणाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत गॅसआधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून, हायड्रोजनसह विविध पर्यायी इंधनांच्या वापरावरही भर दिला जात असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

‘विमानातही जैवइंधन’

शाश्वत विमान इंधनात (एसएएफ) दोन टक्के जैवइंधन मिश्रण अनिवार्य करण्याबाबत जगभरात चर्चा सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. इथेनॉल किंवा रेक्टिफाइड स्पिरिटपासून थेट ‘एसएएफ’ तयार करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही आयसोब्युटॅनॉलवर प्रयोग करत आहोत. भविष्यात ते डिझेलला पर्याय ठरू शकते,’ असेही गडकरी म्हणाले. ‘किर्लोस्कर’ने इथेनॉल आणि आयसोब्युटॅनॉलवर चालणारे जनरेटर संच; तसेच ट्रॅक्टर इंजिन विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात ट्रॅक्टर इथेनॉलवर चालू शकतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.