‘एका अनुभवी राजकारण्याला आणि संसद सदस्याला ‘भाषेवर संयम’ ठेवणे म्हणजे काय, हे माहिती असायला हवे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांना मंगळवारी सुनावले. सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीवरून सुरू असलेल्या फौजदारी अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते मंगळवारी न्यायालयात उपस्थित होते.
न्यायमूर्ती अरविंदकुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या अवमानना याचिकेवर सुनावणी सुरू होती. ‘तुम्ही माफी मागितली आहे. परंतु, इतक्या गंभीर प्रकरणात माफी ही मनापासून असायला हवी, केवळ औपचारिकता म्हणून नको,’ असे न्यायालयाने म्हटले.न्यायमूर्ती कुमार यांनी या प्रकरणी तोंडी टिप्पणी केली. ‘संजय राऊत, तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात. अगदी तुम्ही वकिली करत होतात त्या काळापासून आम्ही तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही एक अनुभवी संसद सदस्य आहात आणि स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्राशीही संबंधित होतात. त्यामुळे, भाषेवर संयम ठेवणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहित असायला हवे,’ असे न्यायालयाने म्हटले.
कोलकाता : कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. बॅनर्जी यांनी केलेली विधाने आणि सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ‘स्पष्टपणे फौजदारी अवमान’ केला आहे, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने बॅनर्जी यांना नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे.