Technical Glitch At Jpmorgan Chase Disrupts Financial Services In America
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपी मॉर्गन चेसमध्ये सोमवारी तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर झाला असून, हजारो ग्राहकांना अनेक प्रमुख अमेरिकी बँकांमधील ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश करताना अडचणी आल्या. ‘झेले’ या पैसे हस्तांतरण सेवेलाही व्यवहारांमध्ये विलंबाचा सामना करावा लागला. या गोंधळाबाबत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सेवा विस्कळित होण्यामागचे कारण काय? एकूण मालमत्तेच्या दृष्टीने अमेरिकेतील सर्वांत मोठी बँक असलेल्या जेपी मॉर्गन चेस ने सांगितले, की सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे बँकेच्या अंतर्गत हार्डवेअर प्रणालींवर परिणाम झाला. त्यामुळे व्यवहारांना विलंब झाला. बँकिंग सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे चेसने सांगितले. चेसच्या काही ग्राहकांना ‘काही सेवा सध्या उपलब्ध नाहीत. त्या पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा,’ असा संदेश दिसत होता. इतर बँकांवरही परिणाम झाला का? हो. बँक ऑफ अमेरिका, सिटी ग्रुप आणि इतर बँकांचे ग्राहक चेससोबत व्यवहार करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना व्यवहार पूर्ण होण्यास विलंब झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, या बँकांच्या स्वतःच्या सेवांमध्ये कोणताही बिघाड झालेला नव्हता. ‘इतर बँकांवर परिणाम झाला असेल, तर तो केवळ आमच्यासोबतच्या व्यवहारातील त्यांच्या सहभागापुरता आणि व्यवहाराच्या वेगातील घटीपुरता मर्यादित होता,’ असे चेसचे प्रवक्ते जो एव्हँजेलिस्टी यांनी स्पष्ट केले. ‘झेले’ सेवेचे काय झाले? चेसमधील तांत्रिक बिघाडाचा थेट परिणाम ‘झेले’वर झालेला नाही. मात्र, चेसच्या ग्राहकासोबत झेलेमार्फत पैसे पाठवताना किंवा स्वीकारताना इतर बँकांच्या ग्राहकांना व्यवहार पूर्ण होण्यास विलंब जाणवला असण्याची शक्यता आहे. ‘झेले’ ही अमेरिकेतील प्रमुख बँका वापरत असलेली वेगवान व्यक्ती-ते-व्यक्ती पैसे हस्तांतरण सेवा आहे. ॲरिझोना येथील ‘अर्ली वॉर्निंग सर्व्हिसेस’ या कंपनीच्या मालकीची ही सेवा आहे. बँक ऑफ अमेरिका, कॅपिटल वन, जेपी मॉर्गन चेस, पीएनसी बँक, ट्रुइस्ट, यूएस बँक आणि वेल्स फार्गो या वित्तीय संस्थांचा अर्ली वॉर्निंग सर्व्हिसेसमध्ये सहभाग आहे. ‘झेले’चे नेटवर्क पूर्णपणे कार्यरत असल्याचे अर्ली वॉर्निंग सर्व्हिसेसच्या प्रवक्त्याने सांगितले. हा सायबरहल्ला होता का? तांत्रिक समस्या सायबरहल्ल्यामुळे झालेली नसल्याचे चेसने स्पष्ट केले. ही एक स्वतंत्र घटना असून, सॉफ्टवेअरमधील त्रुटीशिवाय तिचा अन्य कोणत्याही कारणाशी संबंध नसल्याचे बँकेने सांगितले. सेवा पूर्णपणे कधी पूर्ववत होणार? ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये आणि निधीमध्ये अद्याप प्रवेश असल्याचे चेसने म्हटले आहे. सोमवारी दिवसअखेरपर्यंत ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली.
गेल्या आठवड्यातील ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि हवाई वाहतूक सेवांमधील बिघाडाशी याचा संबंध आहे का? नाही. या घटना काही दिवसांच्या अंतराने घडल्या असल्या, तरी त्यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सरकारी अधिकारी आणि कंपन्यांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या सेवांमध्ये मोठा बिघाड झाला होता. हा बिघाड काही तास सुरू राहिला आणि आउटलूक, टीम्स तसेच एआय असिस्टंट कोपायलटसह अनेक सेवांवर त्याचा गंभीर परिणाम झाला. अपग्रेडदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे हा बिघाड झाल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट’ने सांगितले. हा प्रकार सायबरहल्ल्यासारख्या कोणत्याही घातपाती कारवाईमुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचे संकेत नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. त्यानंतर शुक्रवारी देशाच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेलाही बिघाडाचा फटका बसला. त्यामुळे अमेरिकेतील सर्व विमानसेवा काही तास ठप्प राहिल्या आणि सप्ताहअखेर देशांतर्गत हवाई प्रवास विस्कळीत झाला. जुन्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडल्याने राउटरमध्ये बिघाड झाला आणि ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.