प्रादेशिक नेत्यांसोबत ट्रम्प यांनी साधला संवाद

Contributed by: मनिला,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
trumps discussion with regional leaders in the philippines preparations for trade agreements
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी फिलिपिन्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी प्रादेशिक भागीदार देशांच्या नेत्यांशी चर्चा केली; तसेच व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. फिलिपिन्सची राजधानी मनिला हा ट्रम्प यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यातील पहिला थांबा आहे. त्यानंतर ते चीनला जातील.

दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सागरी क्षेत्रात चीनसोबत अनाक्रमण करार करण्यासाठी आसियान देशांचे नेते प्रयत्नशील आहेत. हा समुद्रमार्ग जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागात चीन आणि फिलिपिन्सच्या तटरक्षक दलांमध्ये तसेच नौदलांमध्ये गेल्या काही वर्षांत संघर्ष वाढले आहेत. मनिला येथे दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांनी क्वाड देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या चार देशांचा क्वाड समूह आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांची क्वाड नेत्यांसोबतची पहिलीच बैठक होती. त्यांनी थायलंडसोबत व्यापारविषयक निवेदनावर स्वाक्षरी केली.
ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी मनिलातील मध्यवर्ती चौकात डाव्या विचारसरणीच्या सुमारे १,५०० आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. फिलिपिन्सच्या नेत्यांनी परराष्ट्र धोरण ठरविताना अमेरिकेच्या प्रभावाखाली राहू नये, अशी मागणी त्यांनी केली.