ज्ञानप्रबोधिनीतील कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वे

Contributed by: विवेक गिरीधारी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ज्ञानप्रबोधिनीतील कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वे
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

स्था अथवा संघटना या संस्थापकांच्या पिढीनंतर दृढपणे उभ्या राहणे; त्यांचा गुणवत्तापूर्ण विस्तार होत राहणे, ही काही सोपी बाब नव्हे. ही काळाने घेतलेली कठोर परीक्षाच असते. मोजक्या संस्था या कसोटीला उतरू शकतात. अशा मोजक्या संस्थांपैकी एक संस्था ही ‘ज्ञानप्रबोधिनी’ आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर येथे उभी राहिलेली तोलामोलाची दुसरी फळी! या दुसऱ्या फळीचे अग्रणी शिलेदार वि. श. तथा सुभाषराव देशपांडे आणि विश्वनाथ तथा विसुभाऊ गुर्जर या द्वयींनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. या द्वयीने मोलाचे व भरीव योगदान संस्थेसाठी दिले आहे.
विसुभाऊ गुर्जर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

विसुभाऊ यांचे वडील हे पुण्यातील ऐतिहासिक ‘खुन्या मुरलीधर मंदिरा’मध्ये प्रवचनकार होते. पुण्यातील निष्णात कीर्तनकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. यातून विसुभाऊ यांच्यावर आध्यात्मिकतेचे संस्कार बालवयातच झाले. लवचीक शरीरामुळे मोठ्या बंधूप्रमाणे विसुभाऊ हेही जिम्नॅस्टिक्समध्ये विशेष गती व प्राविण्य असलेले होते. नूतन मराठी विद्यालयात (नूमवि) त्यांचे शालेय शिक्षण झाले. दरम्यान सन १९६३ मध्ये प्रबोधशाळेच्या माध्यमातून ते ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक वं. अप्पासाहेब पेंडसे यांच्या संपर्कात आले व त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. ठरवून कला शाखेत प्रवेश घेऊन त्यांनी ‘फर्ग्युसन’मधून शिक्षण पूर्ण केले. कोयना भूकंपात प्रबोधिनीने भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या मदतकार्यात ते हिरिरीने सहभागी झाले आणि सलगपणे तिथे राहिले.

संगीताचे शास्त्रशुद्ध धडे गिरवलेल्या विसुभाऊंनी प्रबोधिनीत अनेक पद्यांना चाली लावल्या व त्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना शिकवल्या. संस्कृतमधील प्राविण्य व जाणकार हीदेखील विसुभाऊ यांची एक वेगळी ओळख आहे. ‘एमए’ला पुणे विद्यापीठात संस्कृत विषयात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विसुभाऊ यांनी प्रशालेत २५ वर्षे संस्कृतचे अध्यापन करून चार वर्षे प्राचार्यपदही भूषविले होते. प्रबोधिनीच्या हिशेब व्यवस्थापनाची, अर्थात लेखाविभागाची जबाबदारी त्यांनी लीलया निभावली. प्रदीर्घकाळ, म्हणजे २९ वर्षे, त्यांनी ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्यवाह म्हणूनही कार्य केले आहे.

सुभाषराव देशपांडे यांचा समृद्ध जीवनप्रवास

पुण्यातील शुक्रवार पेठेत राहणारे सुभाषराव देशपांडे हे घराजवळील सरस्वती मंदिर प्रशालेचे विद्यार्थी होते. प्रबोधशाळेत येण्याच्या निमित्ताने त्यांचा ज्ञानप्रबोधिनीशी सन १९६५मध्ये संपर्क आला. तोच आयुष्यभरासाठी निर्णायक वळण लावणारा ठरला आणि हा ऋणानुबंध आजतागायत टिकून आहे, हे विशेष! शाळेत असताना ते खो-खोचे पट्टीचे खेळाडू होते. गो. नी. दांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रायगड मोहिमेत ते सहभागी झाले होते. समाजशास्त्रातील एमए ही पदवी त्यांनी पुणे विद्यापीठातून मिळविली, तर एमबीए ही पदवीदेखील विद्यापीठातून प्रथम क्रमांक प्राप्त करीत मिळविली. त्यांनी खेड शिवापूर येथील दारूबंदी आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला.

फक्त देणगीदारांवर अवलंबून न राहता, प्रबोधिनी ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, या भूमिकेतून १९७०च्या सुमारास प्रबोधिनीत विद्युतधारक (कॅपॅसिटर) निर्मिती व विक्रीचा उपक्रम चालू झाला. तांत्रिक विषयातले शिक्षण घेतलेले नसले तरी, सुभाषराव यांनी सर्व बारकावे आत्मसात करून पुढील सात वर्षे याचे उत्पादनप्रमुख म्हणून काम पाहिले. सलग २८ वर्षे ज्ञानप्रबोधिनीची कार्यवाहपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)