तुळसाई नटतेय...

Contributed by: शरद पुराणिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तुळसाई नटतेय...
तुळशी तुळशी महादेवा,

माझा ठेवा तुझ्यापाशी।
जेव्हा मागशी तेव्हा देशी,

हळदी-कुंकवाच्या राशी॥

दिवाळीचे दिवस ओसरत आलेले असतात. फराळाचे डबे तळाला लागलेले, नातेवाइकांनी आणलेल्या पिशव्या कोपऱ्यात टेकलेल्या, लाडू, चकली, करंज्यांचे आकार पोटात स्थिरावलेले. चिवड्याचे उरलेले डबे कांदा-टोमॅटोच्या सोबतीने भेळ बनून संपत असतात. नव्या कपड्यांवर अत्तराचा मंद वास रेंगाळत असतो आणि प्रवासाच्या पिशव्या दिवाणाभोवती दमून पडलेल्या असतात.

या सगळ्या आवराआवरीत माहेरवाशीण गॅलरीत येते. हातात पाण्याचा कलश. तुळशीला पाणी घालायला जाते आणि क्षणभर थबकते. दोन-चार दिवसांच्या दुर्लक्षाने तुळसाई जरा कोमेजलेली असते; पण तिच्यात अजूनही एक नाजूक चैतन्य दडलेले असते. आता तिच्या लग्नाची तयारी करायची, ही जाणीव होताच घरातला थकवा हलका होतो.

पूर्वीच्या काळी सासू सुनेला सांगायची, ‘अगं, अंगणातल्या तुळशीला रोज पाणी घाल. दिवेलागणीला दिवा लाव. कपाळी कुंकू लाव आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घे.’ पदर डोक्यावर घेऊन सून हे सगळे निमूट करायची. तुळशीचे स्थान केवळ रोपट्याचे नव्हते; ती घराचा उंबरठा, संस्कारांची खूण आणि घरातल्या देव्हाऱ्याइतकीच आपली होती.

काळ बदलला. कुटुंबे मोठी आणि घरे छोटी झाली. पुढे कुटुंबेही विभक्त झाली. गावाकडच्या अंगणातली तुळस वाट पाहत राहिली. सणासुदीला घरात माणसे आली, की ती जणू पुन्हा फुलायची. घरात प्रवेश करण्याआधी तिला नमस्कार व्हायचा. वाडे पडले, माणसे विखुरली, अंगणे हरवली. तुळसही कुठे पत्र्याच्या डब्यात, कुठे कुंडीत, कुठे तुटक्या बादलीत येऊन स्थिरावली. शहरांनी उंची गाठली; पण घरांनी मोकळेपणा गमावला. तुळशीचे महत्त्व मात्र पुन्हा नव्याने जाणवू लागले. कुणी तिला औषधी मानले, कुणी वास्तुशांतीचे प्रतीक, तर कुणी भक्तीचा आधार. अशा रीतीने तुळसमाय पुन्हा घराघरांत परतली.

देवी त्वं निर्मिता पूर्वम्,

अर्चितासि मुनीश्वरैः।

नमो नमस्ते तुलसी, पापं हर हरिप्रिये॥

तुळशीला पाणी घालताना हे सारे स्मरण मनात चमकून जाते. कुंडीतील कचरा ती अलगद बाजूला करते, जणू मुलीची वेणी घालत आहे. माती ओली होते, पानांना पुन्हा टवटवी येते. एक समाधान मनात दाटते, ही लग्न करून सासरी जाणार नाही, आपल्याच घरात राहणार.

पूर्वी तुळशीचे लग्न अगदी साधे असायचे. एक ऊस, आवळा-कवठ, देवघरातील कृष्ण नवरदेव, थोडा गोड प्रसाद आणि दिवाळीत उरलेली एखादी फटाक्यांची लड. आता तिचेही रूप पालटले आहे. कुणी तिला पैठणी नेसवते, कुणी दागिने घालते, कुणी पत्रिकाही काढते. देवघरातील श्रीकृष्ण आठवणीने बाहेर ठेवण्याचा आदेश घरात देते; त्याची वस्त्रे, टोप, हार तयार होतात आणि तिकडे तुळसाईही सजू लागते; बोहल्यावर जाण्यासाठी नटू लागते. घरातली धावपळ थांबत नाही. श्रावण असो, नवरात्र असो, दिवाळी असो किंवा तुळशीचे लग्न... सगळे सांभाळणारी तीच; तरीही तिच्या मनात तक्रार नसते. या सोहळ्यात केवळ पूजा नसते; असतो घराचा श्वास, परंपरेचा धागा आणि मायेचा हिरवा सुगंध. चला, तयारीला लागा. मुहूर्त आलाच... ‘राधा-दामोदर प्रसन्न’ लिहायचे अजून राहिले आहे. या हो, आमच्या तुळशीच्या लग्नाला!