Contributed by: डॉ. विशाल तांबे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
फुले दाम्पत्याच्या विचारांचा जागर
न्नर तालुक्याच्या कुशीत वसलेले ओतूर हे गाव महाराष्ट्राच्या वैचारिक नकाशावर ठळकपणे उमटते आहे. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त येथे होणारे राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशन हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर फुले दाम्पत्याच्या विचारांची आणि त्यांच्या प्रत्यक्ष वास्तव्याची आठवण करून देणारा ऐतिहासिक क्षण आहे. ओतूर हे गाव फुले दाम्पत्यासाठी केवळ एक मुक्कामाचे ठिकाण नव्हते; ते त्यांच्या कामाचे, त्यांच्या संघर्षाचे आणि त्यांच्या माणुसकीच्या प्रयोगाचे एक केंद्र होते. वीस वर्षांपूर्वी हेच सत्यशोधक अधिवेशन ओतूर येथे झाले होते. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ दिवंगत विलासराव तांबे (सर) आणि समकालीन सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.सावित्रीबाई फुले यांनी ओतूर येथे काही काळ वास्तव्य करून दु:खग्रस्तांसाठी काम केले. त्या काळात समाजात जाती, धर्म, लिंग यांच्या नावावर भेदभाव टोकाला पोहोचला होता. स्त्रियांना शिक्षण नाकारले जात होते. विधवांना जगण्याचा अधिकारही नाकारला जात होता. शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाज शोषणाच्या चक्रात अडकला होता. अशा काळात फुले दाम्पत्याने शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे, हे सांगितले आणि ते प्रत्यक्षात आणून दाखविले. ओतूरमध्ये त्यांनी हाच विचार रुजविला. येथील मुलींच्या शाळेत त्यांनी शिक्षणाचा दिवा पेटविला. ही शाळा फुले दाम्पत्याने स्थापन केलेल्या मुलींच्या शाळांपैकी चौथी शाळा मानली जाते. आजही ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २, ओतूर’ म्हणून ही शाळा उभी आहे. तिच्या भिंतींना इतिहासाचा स्पर्श आहे.
ओतूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे-पाटील. भाऊ कोंडाजी हे फुले दाम्पत्याचे निष्ठावान अनुयायी. त्यांनी फुले यांच्या विचारांचा प्रसार आपल्या गावात, आपल्या परिसरात केला. त्यांच्या नावाने आज सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान कार्यरत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण याच शाळेत होणार आहे. ही केवळ पुतळ्यांची स्थापना नाही. ही पिढ्या न् पिढ्या चालत आलेल्या विचाराची पुन्हा होणारी प्रतिष्ठापना आहे. हा परिसर विकासाच्या मार्गावर आला, त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिक्षणतज्ज्ञ दिवंगत विलासराव तांबे (सर) आणि समकालीन सहकाऱ्यांची दूरदृष्टी, योगदान कारणीभूत आहे.
सन १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीभेद, पुरोहितशाही, अंधश्रद्धा यांच्याविरोधात लढा उभा केला. ओतूरमध्ये फुले यांच्या वास्तव्याचा अर्थ आपण आज समजून घेतला पाहिजे. ओतूर तेव्हा खेडे होते आणि येथेही त्याच रूढी, त्याच अंधश्रद्धा, त्याच जातीच्या भिंती होत्या. येथे जाऊन काम करणे म्हणजे केवळ भाषण करणे नव्हते; तर लोकांमध्ये राहणे, त्यांची दु:खे समजून घेणे, त्यांच्या मुलींना शाळेत आणणे, हे होते. सावित्रीबाईंचे ओतूरमधील वास्तव्य हे याचेच प्रतीक आहे.
या अधिवेशनाचे महत्त्व येथेच आहे. ते केवळ भूतकाळाची आठवण नाही. ते वर्तमानाचे भान आहे. आज शिक्षणात खासगीकरण, शाळा बंद होणे, मुलींच्या शिक्षणातील अडथळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील हिंसा, जातीय तेढ, धर्माच्या नावावर राजकारण हे प्रश्न पुन्हा उभे आहेत. फुले दाम्पत्याने दीडशे वर्षांपूर्वी ज्या प्रश्नांना हात घातला, तेच प्रश्न नव्या रूपात आपल्यासमोर आहेत. त्यामुळे ओतूरमध्ये होणारे हे अधिवेशन हे केवळ स्मरण नाही, तर नव्या लढ्याची तयारी आहे. येथे होणाऱ्या परिसंवादातून, नाटकातून, कीर्तनातून, लघुनाटिकेतून फुले विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. ओतूर गावाचीही ही जबाबदारी आहे. या गावाने फुले दाम्पत्याला आपले मानले. आज गावकरी, प्रतिष्ठान, सारथ्य फाउंडेशन आणि सर्व संस्था एकत्र येऊन हे अधिवेशन घडवित आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून दीड-दोन हजार सत्यशोधक येणार आहेत. त्यांची राहण्याची, जेवण्याची सोय गावकऱ्यांनी केली आहे. हीच तर फुले दाम्पत्याची शिकवण आहे. एकत्र येणे, एकमेकांना सांभाळणे, विचारांसाठी एकत्र बसणे.
महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन शनिवार व रविवार (२१ व २२ नोव्हेंबर) सत्यशोधक नगरी, मार्केट यार्ड (ओतूर, ता. जुन्नर, पुणे) येथे होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांत प्रतिमांची मिरवणूक, अर्धपुतळ्यांचे अनावरण, कष्टकरी स्त्री-पुरुष श्रमिकांचा सत्कार, सत्यशोधकांच्या वंशजांचा सत्कार, ‘फुले आणि शिक्षण’, ‘फुले आणि महिला सक्षमीकरण’, ‘फुले आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’, ‘महाराष्ट्रधर्म : मुक्त चिंतन’ या विषयांवर परिसंवाद; तसेच ‘जोतिबाची सावली, सावित्री माऊली’ हे महानाट्य, ‘कीर्तनी : वारी आडवाटंच्या विठोबाची’, ‘ओतूर अभियोग’, ‘खटला’ ही लघुनाटिका आणि ‘खेळ मांडियला’ हे संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील महानाटक सादर होणार आहे.
(लेखक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळचे (ओतूर) अध्यक्ष असून, सत्यशोधक अधिवेशन संयोजन समिती सदस्य आहेत.)