पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मुंबईत २२ नोव्हेंबर रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात येतील. त्यानंतर २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना डोस देणार आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे. या नियोजनासाठी १९ नोव्हेंबर रोजी शहरस्तरीय कृती दलाची बैठक झाली. यात लसीकरणाचा एकही डोस न मिळालेली तसेच अपूर्ण लसीकरण झालेली बालके शोधण्यावर भर देण्यात आला. यापूर्वी बालकाचे पोलिओ लसीकरण झाले असले, तरी २२ नोव्हेंबरच्या मोहिमेत पुन्हा दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला लसीकरण केंद्रावर नेऊन दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.