‘गोल्डन अवर’वर लक्ष

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘गोल्डन अवर’वर लक्ष
‘अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’ जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या काळात वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यात ट्रॉमा केअर केंद्रांची उभारणी आणि रुग्णवाहिका धोरण राबविण्यात येणार आहे. आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करून राज्यातील रस्ते अपघाती मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’ असे राज्याचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

जागतिक रस्ते अपघातग्रस्त स्मरण दिनानिमित्त परिवहन विभाग आणि परिसर संवर्धन संरक्षण संस्था यांच्या वतीने चर्चगेट येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अपघातग्रस्त योगेश दांडगे, सोनाली साळुंके, प्रियंका डंबारके आणि दादाराव भिलारे यांनी अपघातांमुळे त्यांच्या आयुष्यावर आणि कुटुंबांवर झालेल्या परिणामांचे अनुभव मांडले. अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी मदत करणाऱ्या रमा गुप्ता, अनुजकुमार गुप्ता, गोकुळ आढाव, संतोष सैंद, कैलास बोडके, शाम रामदास सवाई, डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. कौस्तुभ घाटोळे आणि नितीन जगताप या नऊ जणांचा ‘गुड समारिटन्स’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र रस्ता सुरक्षा मागण्या परिवहन आयुक्तांकडे सादर करण्यात आल्या. राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, शहरांमध्ये वेग व्यवस्थापन करावे, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी सुरक्षित सुविधा उभाराव्यात, हेल्मेट व सीटबेल्ट नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा बळकट करावी आणि विविध शासकीय विभागांचे उत्तरदायित्व निश्चित करावे, अशा मागण्या परिसर कार्यक्रमाचे संचालक रणजीत गाडगीळ यांनी मांडल्या. पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेवर त्यांनी विशेष भर दिला.

रस्ते अपघातांमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के नुकसान होत असल्याचे सीएसआर डायरीचे परेश शेठ यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी मरिन ड्राइव्ह येथील सुंदर महल जंक्शन ते एसएनडीटी विद्यापीठापर्यंत शांतता पदयात्रा काढण्यात आली. मुंबईतील विविध महाविद्यालयांतील २५० ते ३०० एनसीसी विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत रस्ता सुरक्षेचा संदेश दिला.