माणकोली नाका परिसरात वाहतुकीत बदल

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,ठाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
माणकोली नाका परिसरात वाहतुकीत बदल
भिवंडीतील माणकोली नाका परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केली आहे. वेहळेगाव चौक ते माणकोलीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांसाठी एकमार्गी करण्यात आला असून, या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सक्तीने बंदी घालण्यात आली आहे.

माणकोली जंक्शन येथे मोठागाव, डोंबिवलीकडे जाण्यासाठी एकपदरी अरुंद रस्ता आहे. रस्त्याच्या प्रवेशाजवळ मोठा चढ असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. एखादे वाहन अचानक बंद पडल्यास या परिसरात तातडीने वाहतूककोंडी निर्माण होते. त्याचा परिणाम राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवरही होतो.
या पार्श्वभूमीवर, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माणकोली परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नव्या व्यवस्थेनुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याकडून माणकोलीमार्गे मोठागाव, डोंबिवलीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने माणकोली पुलावरून पुढे जाऊन लोढा पुलाखालून सेवा रस्त्याने ओवळी खिंड अंडरपास येथे यूटर्न घेतील. त्यानंतर एका ढाब्याच्या पुढून डावीकडे वळून डोंबिवली लिंक रस्त्याने मोठागाव पुलावरून पुढे पर्यायी मार्गाने जातील.

ही अधिसूचना पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नसेल.