शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे अखेर आमदारांनाच रस्त्यावर उतरावे लागले. रस्त्यांच्या कडेला साचलेली माती, वाढलेले गवत, धुळीचे साम्राज्य आणि ठिकठिकाणी दिसणारी अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अधिकाऱ्यांसह रस्ते स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
अंबरनाथ शहरात विविध विकासकामे आणि मोठे लोकोपयोगी प्रकल्प सुरू असल्याचे चित्र असले, तरी दैनंदिन स्वच्छतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वच्छ रस्ते, कचरामुक्त परिसर, धूळमुक्त वातावरण आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथ या मूलभूत सुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता प्रकर्षाने जाणवत आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांच्या कडेला माती साचली आहे. दुभाजकांवरील रंग उडाला असून अनेक ठिकाणी गवत वाढले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे., दिवाळी संपल्यानंतरही शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असल्याने स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंत्यांची भेट घेऊन शहरातील रस्ते स्वच्छतेच्या प्रश्नावर जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला.