दुचाकीस्वार धोक्यात

Contributed by: महेश गायकवाडmahesh.gaikwad@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दुचाकीस्वार धोक्यात
संथ कामांमुळेही

अपघातांत वाढ
ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दहा महिन्यांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पादचाऱ्यांच्या मृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयुक्तालयाच्या हद्दीत अपघातांच्या संख्येत १४.४६ टक्क्यांनी वाढ झाली असून, तीन प्रमुख रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

रस्ते अपघातांमध्ये दर वर्षी मोठ्या संख्येने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानासह विविध उपक्रम राबवले जातात. सेलिब्रिटींच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून कारवाईही केली जाते. मात्र, या उपाययोजनांनंतरही अपघातांचा आलेख कमी होताना दिसत नाही.

अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, लेन कटिंग, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे, वाहन सुस्थितीत नसणे ही अपघातांची काही प्रमुख कारणे मानली जातात. मात्र, वाढत्या अपघातांसाठी केवळ वाहनचालकांची चूकच कारणीभूत नसून रस्त्यांमधील दोष, जंक्शनचे अयोग्य डिझाइन, लेन मार्किंगचा अभाव, अस्पष्ट झेब्रा क्रॉसिंग आदी बाबीही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

ठाण्यासह अन्य शहरांत पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसणे किंवा ते अस्पष्ट होणे, रस्त्यांवरील वाहतूक नियोजनातील त्रुटी यांमुळे पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडते.

दर वर्षी मोठ्या संख्येने नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. अवजड वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, रस्त्यांची क्षमता तेवढीच असल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कामावर किंवा अन्य ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत वाहनांचा वेग वाढवला जातो आणि त्यातून जीवघेणे अपघात घडत असल्याचे निरीक्षण नोंदवले जाते.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सन २०२५ मध्ये ऑक्टोबरअखेर ८०९ अपघातांची नोंद झाली होती. तर, २०२६ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ९२६ अपघातांची नोंद झाली आहे. म्हणजेच यंदा अपघातांची संख्या ११७ने वाढली आहे. या अपघातांमध्ये १२५ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७९ पादचाऱ्यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. याशिवाय इतर वाहनचालक आणि प्रवाशांनाही अपघातांत जीव गमवावा लागला आहे.

संथ कामांमुळेही

अपघातांत वाढ

रस्त्यांची तसेच विविध प्रकल्पांची संथगतीने आणि एकाचवेळी सुरू असलेली कामे यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. कामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी न घेणे, रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांकडे संबंधित प्राधिकरणांचे दुर्लक्ष, गुणवत्तापूर्ण रस्त्यांचा अभाव, तसेच घाईगडबडीत रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधकामांचे निर्णय घेणे, या कारणांमुळेही अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.

दुचाकीस्वार धोक्यात