डोंबिवली पश्चिमेतील एका बांधकाम सुरू असलेल्या शाळेच्या आवारातून एल्युमिनियमच्या प्लेट्स चोरीला गेल्याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. चोरीचा माल नेण्यासाठी आलेला टेम्पो रस्ता चुकल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत चोरीचा छडा लावला आणि मुद्देमाल हस्तगत केला.
डोंबिवलीतील मोठागाव परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी आणलेल्या महागड्या ॲल्युमिनियम प्लेट्स चोरट्यांनी पळवून नेल्या होत्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरीचा माल नेण्यासाठी वापरलेल्या टेम्पोबाबत पोलिसांना संशय आला. मोठागाव पुलावरून आलेला हा टेम्पो चोरीचा माल ठेवलेल्या ठिकाणी जाण्यासाठी मोबाइलवर दिलेल्या नकाशानुसार निघाला होता. मात्र, चालक रस्ता चुकला आणि टेम्पो शहरातील दुसऱ्या मार्गावर गेला.शहरातील रस्त्यांवर फिरताना हा टेम्पो काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टेम्पोचा माग काढला आणि चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत चोरीचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी आरोपींनी चोरी करून लपवून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत केला. या टोळीचा म्होरक्या अमित कुमार हा भंगार विक्रेता असल्याची माहिती आहे.