ताटातील कोलम शंभरीपार

Contributed by: नवी मुंबई,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ताटातील कोलम शंभरीपार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तांदळाच्या दरांमध्ये तेजी कायम आहे. दिवाळीच्या तोंडावर ८५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचलेले तांदळाचे दर दिवाळीनंतर आणखी वाढले आहेत. विशेषतः मुंबईकरांच्या पसंतीचा वाडा कोलम तांदूळ आता ११० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तांदळाचे सर्वसाधारण दर ३० ते ६० रुपये किलोवरून ८० ते १२० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.

कमी पावसामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात घट झाली असून, बाजारातील आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. नवीन हंगामातील तांदळाची आवक सुरू होईपर्यंत दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने तांदळाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी घट झाल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांसाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात तांदळाची आवक होते. मात्र, यंदा या भागांतून होणारी आवक कमी झाल्याने बाजारात तांदळाची उपलब्धता घटली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात दरवाढ सुरूच आहे.

मुंबईत वाडा कोलम तांदळाला सर्वाधिक मागणी असते. . यापूर्वी ५० ते ७० रुपये किलो असलेला वाडा कोलम तांदूळ दिवाळीच्या तोंडावर ८० रुपयांवर पोहोचला होता. आता दिवाळीनंतर त्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. मुंबईच्या घाऊक बाजारात वाडा कोलमचे दर ८० ते ८५ रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात हे दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सुरती कोलम १०० रुपये, तर अतिशय बारीक दर्जाचा नंबर वन कोलम १२० रुपये किलोने विकला जात आहे, अशी माहिती तांदूळ व्यापारी तेजपाल तेली यांनी दिली. उत्तर प्रदेशातून येणाऱ्या सोना तांदळाचे घाऊक दर ५५ ते ६० रुपये किलो असून, किरकोळ बाजारात तो ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. बासमती तांदळाचे दर मात्र स्थिर आहेत.