मुंबई : लोकल अचानक थांबते... मिनिटे उलटतात, अर्धा तास होतो; पण गाडी हलत नाही. का थांबली? आणखी किती वेळ थांबणार? आणि प्रवास कधी सुरू होणार? याचे उत्तर मात्र मिळत नाही. कामावर पोहोचण्याची घाई, घरी वाट पाहणारी माणसे आणि डब्यातील वाढता अस्वस्थपणा घेऊन प्रवासी केवळ अंदाज बांधत राहतात. आधुनिक यंत्रणा असूनही प्रवाशांना साधी माहिती मिळू नये, अशा रेल्वे प्रशासनाच्या मागासलेल्या कारभाराला लोकलप्रवाशांना रोज सामोरे जावे लागते.
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर गाडी किती वेळ थांबणार, प्रवास पुन्हा कधी सुरू होणार आणि विलंबाचे नेमके कारण काय, याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने त्यांची गैरसोय वाढत आहे. उद्घोषणा यंत्रणा, डिजिटल दर्शक फलक आणि आपत्कालीन संवाद यंत्रणा अशा आधुनिक सुविधा लोकलमध्ये असतानाही बिघाडाच्या वेळी त्यांचा प्रभावी वापर होत नसल्याचे चित्र आहे.गाडी का थांबली, किती वेळ थांबणार, बिघाडाचे कारण काय आणि वाहतूक कधी पूर्ववत होणार, या प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना मिळत नाहीत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गांवर तांत्रिक बिघाड, लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील दोष तसेच सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेकदा लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभी राहते. अशा वेळी डब्यातील प्रवाशांना अधिकृत माहिती मिळत नाही. मोटरमनकडून उद्घोषणा केली जात नाही किंवा उपलब्ध संवाद यंत्रणेचा वापर होत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो.