पेशवेपूर्वकालीन कुंभमेळा स्थान असलेले बेझे-चाकोरे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील श्री क्षेत्र चक्रतीर्थ येथे वैकुंठ चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज (दि. २३) सकाळी ११.३० वाजता धर्मध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्रीराम शक्तिपीठ संस्थानच्या वतीने हा सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार वर्मा यांच्यासह अधिकारी, साधू-संतांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्रीराम शक्तिपीठ संस्थानात सकाळी १०.३० वाजता श्री गणपती आवाहन, पुण्याहवाचन, धर्मध्वजपूजन आदी विधींना प्रारंभ होणार आहे. ठीक ११.३० वाजता पंचायती निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर मान्यवरांची भाषणे होऊन महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.दरम्यान, बेझे-चाकोरे येथे पेशवेपूर्व काळात कुंभमेळा होत असल्याची नोंद काही ग्रंथ व पेशवेकालीन ताम्रपटावर आढळून येते. मात्र, अनेक वर्षांपासून हे स्थान दुर्लक्षित असून, यंदाच्या कुंभमेळ्यातही तेथे विकासकामे झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
येत्या कुंभमेळ्यात चाकोरे येथे एक दिवस पर्वणीस्नान होणार आहे. सर्व आखाड्यांचे साधू-संत मिळून त्याची तारीख ठरवणार आहेत. लवकरच ती जाहीर केली जाईल, असे स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.