Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पीव्हीडी म्हणजे काय?
मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारताना त्याचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. भराव टाकलेल्या जमिनींमध्ये माती स्थिर होण्याची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दहिसर ते मिरा रोडदरम्यान जमिनीखाली प्री-फॅब्रिकेटेड वर्टिकल ड्रेन ( पीव्हीडी ) बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे चालणारी माती स्थिरीकरणाची प्रक्रिया सहा महिन्यांत ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे नवीन रेल्वे रुळ उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणे शक्य होणार आहे.एमआरव्हीसीकडून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प संचातर्गत ( एमयूटीपी ३) बोरिवली ते विरारदरम्या पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. नव्या दोन मार्गिका टाकण्यासाठी दहिसर ते मिरा रोडदरम्यान काही ठिकाणी माती मऊ असल्याचे समोर आले आहे. अशा मातीवर रुळांची उभारणी केल्यास मुसळधार पावसात किंवा पाणी साचल्यावर रुळांखालील माती घसरण्याचा धोका वाढतो. यामुळे माती घट्ट राहण्यासाठी पीव्हीडी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे.
दहिसर ते मिरा रोड दरम्यान सुमारे ३.२० लाख मीटर लांबीचे पीव्हीडी बसवण्याचे नियोजन आहे. यासाठी एक विशेष मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. रोज सुमारे तीन हजार मीटर काम करण्याची या यंत्राची क्षमता आहे. आत्तापर्यंत ३० हजार मीटरचे काम पूर्ण झाले आहे. जागेची उपलब्धता आणि कामाची गरज लक्षात घेऊन आणखी यंत्रे तैनात करण्यात येणार आहेत, असे एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीव्हीडी तंत्रज्ञानांतर्गत मऊ मातीच्या ठिकाणी मजबुतीसाठी जमिनीत विशिष्ट प्रकारचे उभे ड्रेन बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मातीतील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याची प्रक्रिय जलदपणे होईल. परिणामी, माती लवकर घट्ट होऊन तिची भार पेलण्याची क्षमता वाढेल. पुढील बांधकामांसाठी आवश्यक असलेली जमिनीची स्थिरता मिळाल्यावर त्यावर रुळांची उभारणी करण्यात येणार आहे.
बोरिवली आणि विरारदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल आणि मेल-एक्स्प्रेस यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेसमुळे लोकलचा होणारा खोळंबा टळण्यास मदत होणार आहे.
पीव्हीडी म्हणजे काय?
मऊ आणि दलदलीच्या जमिनीची मजबुती वाढवण्यासाठी वापरले जाणारे अभियांत्रिकी तंत्रज्ञान म्हणजे प्रीफॅब्रिकेटेड वर्टिकल ट्रेन अर्थात, पीव्हीडी. जमिनीमध्ये विशिष्ट प्रकारच्या उभी ड्रेन व्यवस्था ठरावीक अंतरावर खोलवर बसवण्यात येतात. यासाठी विशेष यंत्राची मदत घेतली जाते. मातीतील अतिरिक्त पाणी ड्रेन्सच्या माध्यमातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. त्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होतो आणि मातीचे स्थिरीकरण लवकर होते. माती घट्ट झाल्याने तिचा भार पेलण्याची क्षमता वाढते.