जनगणनेसाठी प्रशिक्षणांवर भर

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

कुटुंबांना द्यावी लागणार ४० प्रश्नांची उत्तरे

Maharashtra Times
राज्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तब्बल १५ वर्षांच्या खंडानंतर ही जनगणना होत असून, जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जनगणनेची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार, तहसील कार्यालयांतील तांत्रिक प्रतिनिधी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी, २१ रोजी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना जनगणनेचे नियम, निकष, माहिती संकलनाची पद्धत आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय स्थितीचे चित्र स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून जनगणनेकडे पाहिले जाते. नागरिकांना विचारावयाचे प्रश्न, माहितीची गोपनीयता, नोंदींची अचूकता आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजातील अडचणींबाबत तहसीलदारांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुढील टप्प्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये जनगणनेत प्रत्यक्ष सहभागी होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर गाव आणि शहर पातळीवर जनगणनेच्या पुढील टप्प्यांची अंमलबजावणी होणार आहे.

स्व-गणनाही करता येणार

यंदा प्रथमच डिजिटल पद्धतीने माहिती संकलन होणार असून, स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध असणार आहे. नागरिकांना स्वतःहून आपली माहिती नोंदविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जनगणना प्रक्रियेला अधिक गती मिळू शकेल. घराघरांत जाऊन माहिती संकलित करताना त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक प्रश्नाचे महत्त्व आणि त्यामागील उद्देश समजावून सांगण्यात येत आहे.

जनगणना करताना प्रत्येक कुटुंबाकडून सुमारे ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित होणार आहे. यामध्ये नागरिकांचे नाव, राष्ट्रीयत्व, धर्म, सामाजिक प्रवर्ग, दिव्यांगत्व, मातृभाषा, साक्षरता, शैक्षणिक पात्रता आणि व्यवसाय यासह विविध बाबींचा समावेश आहे. घराची रचना, कुटुंबातील सदस्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, वीज आणि अन्य मूलभूत सुविधांची माहिती घेतली जाणार आहे. बँक खात्यांसह प्रवासाची साधने आणि घरातील वस्तूंची नोंदही घेतली जाणार आहे.