राजस्थानमधून येऊन मुंबईत चोऱ्या

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

अल्पवयीन साथीदारासह दोघे जेरबंद

Maharashtra Times
वांद्रे पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मानवी तपास कौशल्याच्या आधारे राजस्थानमधील भिलवाडा येथे जाऊन सराईत सोनसाखळी चोर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे मुंबईतील सोनसाखळी चोरी व दुचाकी चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री वांद्रे पश्चिम येथील सेंट सेबॅस्टियन रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेली होती. आरोपी भिलवाडा येथून रेल्वेने मुंबईत यायचे, शिवाजी पार्क हद्दीतून दुचाकी चोरायचे आणि त्यावरून वांद्रे, विलेपार्ले व अंधेरी परिसरात सोनसाखळी चोरी करून पुन्हा रेल्वेने पळून जायचे. वांद्रे पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी भिलवाडा येथे जाऊन एका आरोपीला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६५ ग्रॅम वजनाच्या सात सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींवर मुंबई व राजस्थानमध्ये जबरी चोरी व घरफोडीचे ९ गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.