Contributed by: नाशिक,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
करार नूतनीकरणासाठी पाठपुरावा सुरू
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अर्थात ‘एमटीडीसी’चा गंगापूर धरणावरील ‘बोट क्लब’ सुरू करण्यास परवानगी कधी द्यायची, याचा निर्णय जलसंपदा विभागामार्फत डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. हा निर्णय वरिष्ठ कार्यालयाच्या पातळीवरील असून, याबाबत नियामक मंडळामध्ये प्रस्ताव मांडावा लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या नाशिक कार्यालयामार्फत सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत नाशिकमधील बोट क्लब पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मात्र, यंदा पावसाळ्यापासून बोट क्लब बंद असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर निराशा होत आहे. जवळपास चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेला हा बोट क्लब कधी सुरू होणार, हे ‘एमटीडीसी’लाही माहीत नाही. याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत घेतला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले.बोट क्लबसाठी धरणाचे पाणी वापरण्याबाबत ‘एमटीडीसी’ला जलसंपदा विभागाची परवानगी घ्यावी लागते. याबाबतचा पंचवार्षिक करार डिसेंबर २०२५ मध्ये संपला असून, वर्ष उलटले तरी नवीन करार करण्यात आलेला नाही. हा करार झालेला नसतानाही ‘जलसंपदा’मार्फत बोट क्लबला काही महिने परवानगी देण्यात आली होती. मात्र, पर्यटन धोरणाबाबतचा नवीन शासन अध्यादेश जाहीर झाल्यामुळे त्यानुसार करारात काही बदल करावे लागणार आहेत.
या बदलांनुसार पुढील करार केला जाणार असून, यासाठी नियामक मंडळामध्ये प्रस्ताव मांडावा लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरनंतरच बोट क्लब कधी सुरू होणार, हे स्पष्ट होणार आहे.
याबाबत जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले की, पर्यटन धोरणाबाबतच्या नवीन अध्यादेशामध्ये धरण परिसरातील सरकारी जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबत काही महत्त्वाच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय आता आमच्या अखत्यारीत नाही. या नवीन धोरणांनुसार बोट क्लबच्या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आमचाही पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.