अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी के. के. वाघ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष अधिकारी नवनाथ डोंगरे, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, तसेच सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नांदगावकर यांनी यावेळी महाडीबीटी २.० पोर्टलवर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने महाविद्यालय स्तरावर महाडीबीटी कक्ष तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहू नयेत, यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विशेष मदत कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही नांदगावकर यांनी केले.