तीन हजार वर्षांची ‘बायसन जंप’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
टेक्सास : टेक्सास पॅनहँडल भागातील एका नैसर्गिक कड्याचा आदिवासी समुदायांनी सुमारे तीन हजार वर्षे रानगव्याची (बायसन) शिकार करण्यासाठी वापर केला असल्याचे पुरातत्त्वीय अभ्यासातून समोर आले आहे. या पद्धतीला ‘बायसन जंप’ म्हटले जाते. ‘अमेरिकन अँटिक्विटी’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात ही माहिती देण्यात आली आहे. राइस विद्यापीठातील ऑगस्ट गस कोस्टा यांच्या नेतृत्वाखाली ब्रायन ए. हॉक, ॲलिसन एस. लाइल, लॅरी बेमेन्ट, क्रिस्टोफर लिंट्झ, कॅथरीन एल. लॉरेन्स, सी. डेव्हिड फ्रेडरिक आणि ब्रायन जे. क्युलेटॉन यांनी हे संशोधन केले.

शिकारी गव्यांच्या कळपाला विशिष्ट दिशेने हुसकावत नेत आणि कड्याच्या टोकाकडे वळवत. पुढे कडा असल्याचे लक्षात येईपर्यंत गवे वेगाने धावत येत आणि अनेक प्राणी खाली कोसळत. त्यानंतर शिकारी खाली जाऊन मांस, कातडी, हाडे आणि इतर उपयोगी भाग गोळा करीत. या ठिकाणी संशोधकांना गव्यांची हाडे, दगडी हत्यारे आणि बाणांची टोके मोठ्या प्रमाणावर आढळली. अवशेषांच्या थरांवरून हे ठिकाण एकदाच नव्हे, तर अनेक पिढ्यांनी दीर्घ काळ वापरले असावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
प्रत्येक शिकारीच्या घटनेत किमान शंभर वर्षांचे अंतर होते. यावरून या ठिकाणाची माहिती आणि शिकारीचे तंत्र पिढ्यान् पिढ्या पुढे दिले गेले असावे, असे संशोधकांचे मत आहे. या शोधामुळे त्या काळातील आदिवासी समाज केवळ भटक्या शिकाऱ्यांचा समूह नव्हता, तर त्यांना प्राण्यांच्या हालचाली, भूभाग आणि सामूहिक शिकारीचे अत्यंत अचूक नियोजन माहीत होते, हे स्पष्ट होते.