कामगिरीत सातत्य राखण्यावर माझा भर

Contributed by: वेलिंग्टन,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
‘मी क्षेत्ररक्षण करत असो किंवा फलंदाजी, मैदानावर उतरल्यावर मला खूप मजा करायची असते. कामगिरीत सातत्य राखून संघासाठी जास्तीतजास्त योगदान देण्यावर माझा भर असतो,’ अशी प्रतिक्रिया भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने व्यक्त केली.

चारही सेना देशांमध्ये कसोटी शतके झळकावणारा पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यांत पंतला सहभागी होता आले नव्हते. बाजूच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नसल्याने त्याच्या सामन्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कसोटी मालिकेत सहभागी असलेल्या बहुतांश खेळाडूंना सामन्याचा सराव मिळाला होता. मात्र, पंतला तो मिळू शकला नव्हता. रविवारी पंतने १५३ चेंडूंत १२८ धावांची शानदार खेळी करून आपल्या फॉर्म आणि तंदुरुस्तीबाबतच्या सर्व शंका दूर केल्या. चारही सेना देशांमध्ये शतक झळकावणारा तो केवळ सहावा भारतीय फलंदाजही ठरला.
पंतने डावात सहा षटकार लगावले. याबाबत तो म्हणाला, ‘लहानपणी माझी नक्कीच अशी उद्दिष्टे असायची. खूप सारे षटकार मारायचे, असे मला वाटायचे; पण आता माझ्या कारकिर्दीत मी त्याचा विचार करत नाही. मी जिथे खेळतो, तिथे अधिक सातत्य राखायचे आणि संघासाठी प्रभाव पाडायचा, एवढीच माझी इच्छा आहे.’ कसोटी अनिर्णित राहील की नाही, याबाबत त्याने फारसे भाष्य केले नाही.