‘...तिथे अजितदादांना आणायचे का?’

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,जालना|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘...तिथे अजितदादांना आणायचे का?’
‘आनंदराज यांनी माफी मागावी’

‘जिथे पाऊसच पडत नाही, तिथे अजितदादांना आणायचे काय? ते तलाव भरायचे आणि जिरवायचे आहेत काय? सरकारचा मूर्खपणा सुरू आहे’, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केली. ‘रिपब्लिकन सेनेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आनंदराज यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून याबाबत त्यांनी माफी मागावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
‘महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो; मात्र पावसाचे पाणी साठवून ठेवले जात नाही. नियोजनशून्य राज्यकर्त्यांमुळेच दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्यकर्ते बदलले नाहीत, तर हा मानवनिर्मित दुष्काळ कायम राहील, असे आंबेडकर म्हणाले. जिथे पाऊस पडत नाही, तिथे अजितदादांना आणायचे का’, असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात मंत्रिपदी असणाऱ्या अजित पवार यांनी धरणांतील पाण्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते, त्या संदर्भात आंबेडकर यांनी हा प्रश्न विचारला. मात्र त्यांच्या या प्रश्नामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

‘आनंदराज यांनी माफी मागावी’

मुंबई : रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव घेत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आनंदराज यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हे विधान अजित पवार यांनी केलेल्या उपरोधिक विधानावर आधारित असल्याचे सांगत आनंदराज यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय मुख्य उमेश पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘आंबेडकर यांनी माफी मागितली पाहिजे. सारवासारव चालणार नाही. अजितदादांच्या कार्याची ओळख सांगण्याची वेगळी गरज नाही. महाराष्ट्र आजही दादांच्या संदर्भात हळहळतोय. अजितदादा हयात नसताना त्यांच्याबद्दलचे विधान शोभणारे नाही’, अशी टीका पाटील यांनी केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचला नाही. केवळ फक्त रक्ताचे वारस म्हणून आपण लोकांच्या पुढे जात आहात. विचाराचा वारसदार म्हणून पुढे जाताना समाज निश्चितच तुलना करत असतो’, असा टोलाही त्यांनी लगावला. पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनीही आनंदराज यांच्यावर टीका केली.