‘दुसरा टप्पा जानेवारीत’

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘दुसरा टप्पा जानेवारीत’
‘शहरी भागातील आव्हानांचा विचार करून नियोजन करा’

जनगणना २०२७च्या दुसरा टप्पा १० जानेवारी २०२७पासून सुरू होत आहे. १० ते २४ दरम्यान, स्वयंगणना करण्यात येणार असून २५ जानेवारीपासून घरोघरी जाऊन गणना करण्यात येणार आहे. ‘टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे’, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.  जनगणना २०२७च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने झाले. संयुक्त सचिव (केंद्र सरकार) व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनगणनेतील माहिती अचूकपणे संकलित करण्याचे महत्त्व विशद केले.
‘जनगणनेतील त्रुटींचा परिणाम मतदारसंघ पुनर्रचना, वैधानिक आरक्षण तसेच आगामी दशकातील लोकसंख्याविषयक मूलभूत आकडेवारीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात तैनात करण्यात येणाऱ्या सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांनी प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल, याची दक्षता घ्यावी’, असे त्यांनी सांगितले. बेघर व्यक्ती, वसतिगृहे, कारागृहे, हॉटेल्स, पेइंग गेस्ट निवासस्थाने तसेच दुर्गम आणि वंचित भागांतील लोकसंख्येची नोंद घेण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली, प्रगणकांसाठी पीई मोबाइल ॲप, ऑनलाइन स्वयं-गणना आणि रिअल-टाइम देखरेख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ‘शहरी भागातील आव्हानांचा विचार करून नियोजन करा’ अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील जनगणनेदरम्यान येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, नागरिकांची सततची ये-जा, दाट वस्ती आणि शहरांचा विस्तार यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बंद किंवा रिकाम्या घरांसाठी आवश्यकतेनुसार पुन्हा भेटी देणे, प्रगणकांची नियुक्ती व प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मानधन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.