सात गावांना मिळणार शुद्ध पाणी

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सात गावांना मिळणार शुद्ध पाणी
कोराडी परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत १४१ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचा नांदा, पांजरा, महादुला, कोराडी, खापरी आणि कोराडी वसाहतीतील नागरिकांना लाभ होणार आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फायदा मिळणार आहे. नव्या यंत्रणेमुळे पाण्याचे शुद्धीकरण अधिक प्रभावीपणे होऊन परिसरातील नागरिकांना नियमित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल.

या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, महादुला नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा हेमलता सावजी, उपाध्यक्ष वैशाली पखिड्डे, कोराडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र धनोले, रामबाबू तोडवाल, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक विलास मोटघरे, मुख्य अभियंते विराज चौधरी व भूषण शिंदे, उपमुख्य अभियंता शिरीष वाठ, सिद्धार्थ लखानी, मनोज सावजी, सचिन पाटील, पन्नालाल रंगारी आदी उपस्थित होते.
२७ एमएलडी क्षमतेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून सध्या परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अस्तित्वातील जलशुद्धीकरण यंत्रणेची क्षमता मर्यादित असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देताना अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी पाठपुरावा केला.