जनगणना, एसआयआर मोहीम आणि विधान परिषद निवडणुकांच्या कामांसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा फटका नागपूर महापालिकेच्या महसूल वसुलीला बसला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत मनपाच्या तिजोरीत अवघे २ हजार ४०० कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६,२०० कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट निश्चित असताना आतापर्यंत केवळ ३९ टक्केच उद्दिष्ट गाठता आले आहे. जादाच्या शासकीय कामांचा ‘स्पीडब्रेकर’ यास कारण असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर, नगररचना आणि जलप्रदाय विभागांची कामगिरीही अपेक्षेपेक्षा कमी आहे. मालमत्ता कर विभागाने ३२५ कोटींच्या उद्दिष्टापैकी १७० कोटींहून अधिक वसुली केली आहे. नगररचना विभागाने ५५० कोटींच्या तुलनेत सुमारे २४९ कोटी, तर जलप्रदाय विभागाने २०० कोटींच्या उद्दिष्टापैकी १३५ कोटी रुपये जमा केले आहेत. या तीन विभागांचे एकत्रित उद्दिष्ट १ हजार ७५ कोटी असून, आतापर्यंत ५५४ कोटींची प्राप्ती झाली आहे. अजून ५२१ कोटींची वसुली बाकी आहे.महापालिकेला जीएसटी अनुदानाचा मोठा आधार मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार १२० कोटी रुपये जीएसटी अनुदानातून प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कातील हिश्श्यापोटी २५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, स्वतःच्या उत्पन्नाच्या स्रोतांमधून अपेक्षित महसूल मिळत नसल्याने आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मालमत्ता कर वसुलीसमोरही अडथळे आहेत. शहरातील सुमारे सात लाख मालमत्तांपैकी केवळ १.७५ लाख मालमत्ताधारकांनाच मागणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तब्बल ५.२३ लाख मालमत्ता अद्याप प्रक्रियेबाहेर आहेत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना जनगणना, मतदार यादी पुनरीक्षण आणि विधान परिषद निवडणुकांच्या कामांसाठी नियुक्त केल्याने वसुलीचा वेग मंदावला. आता १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वगणना, २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष गणना आणि १ ते ५ मार्चदरम्यान पुनरावलोकन होणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या विकासकामांच्या सुमारे ९०० फायली निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्याने महसूल वसुलीला गती देण्यासोबतच जनगणनेची जबाबदारी पार पाडण्याची दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.