नागपूर : शहरातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला प्रोत्साहन देण्यासोबतच भक्तीभाव, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वात आज, २३ नोव्हेंबरपासून ‘महापौर कीर्तन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. रमणा मारोती मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता कीर्तन महोत्सवाला प्रारंभ होणार असून, यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. सोपानदादा कानेरकर यांचे कीर्तन होणार आहे.
शहरात फाऊंटन पेन शो २८पासून होणारनागपूर : ऑरेंज सिटी अक्षर फाऊंडेशनच्यावतीने ऑरेंज सिटी फाऊंटन पेन शोचे आयोजन दीक्षाभूमीजवळील शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयात २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी ७ वाजतादरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान हस्ताक्षर आणि कॅलिग्राफी स्पर्धा, कॅरिकेचर्स स्पर्धा आणि कॅलिग्राफी कार्यशाळा होणार आहेत.
उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताल उत्सव
नागपूर : सहकारनगर येथील ताल-प्रभा कलामंदिरच्यावतीने येत्या मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी ‘ताल उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.१५ वाजता हा कार्यक्रम होईल. राजू गुजर, रघुनंदन परसतवार आणि डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर हे प्रमुख पाहुणे असतील. ताल प्रभा कलामंदिराचे वादक तबलावादन करतील तर राघव सरमुकदम आणि कुशल दहाट संवादिनीवर संगत करतील. सोनाली अडावदकर आणि सन्मती अडावदकर संचालन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विनय ढोक, अजित भगत आणि नितीन संगमनेरकर यांनी केले आहे.
एकांकिका बहुभाषी नाट्य महोत्सव आजपासून
नागपूर : कला सागरच्या आणि विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्यावतीने आयोजित २१व्या एकांकिका बहुभाषी नाट्य महोत्सवाला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. सीताबर्डी येथील हिंदी मोर भवन येथे सायंकाळी ६ वाजता सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व नागपूर विद्यापीठाचे लोकपाल शरद त्रिवेदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून विलास हरडे, विजय मेनन, अरविंद पाटील, कला सागरचे मुख्य संरक्षक व सचिव पदम नायर, अध्यक्ष रविशेखर गिल्लूरकर, कार्याध्यक्ष सुशील तिवारी आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर राष् ट्रभाषा प्रचार समितीतर्फे मयूर मानकर दिग्दर्शित ‘पंचलेट’ ही हिंदी एकांकिका सादर केली जाईल. २७ नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.