सोन्याच्या शुद्धतेबाबत अफवा नकोत

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

ग्राहकांना आवाहन

सोन्याच्या शुद्धतेबाबत अफवा नकोत
सोन्याच्या दागिन्यांमध्ये पावडर किंवा चायनीज अलॉयच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेनियम आणि इरिडियमसारख्या घटकांची भेसळ होत असल्याच्या चर्चा सध्या बाजारात सुरू आहेत. याबाबत आपल्या देशात अद्याप एकही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. भारतीय मानक ब्युरो या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सुवर्ण उद्योगाने व ग्राहकांनी घाबरून न जाता अफवांऐवजी तथ्ये आणि सतर्कतेच्या आधारे व्यवहार करावा, असे आवाहन ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) केले आहे.

सोन्यामध्ये रेनियम आणि इरिडियम यांसारखे घटक मिसळल्यास वजनात वाढ होऊ शकते. परंतु, त्या प्रमाणात शुद्धता वाढत नाही, अशा अनौपचारिक तक्रारी व माहिती काही स्तरांवर ऐकायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जीजेसीने हा विषय आधीच बीआयएसच्या निदर्शनास आणून दिला आहे. अशा घटकांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक तपासणी यंत्रणा व तंत्रज्ञान हॉलमार्किंग केंद्रांवर उपलब्ध आहे, अशी माहिती जीजेसीचे अध्यक्ष चेअरमन राजेश रोकडे यांनी दिली.
भारतीय सराफा उद्योगात अशा प्रकारच्या भेसळीचे प्रमाण नगण्य असल्याचे चित्र आहे. भेसळीच्या उद्देशाने अशा पदार्थांची निर्मिती, पुरवठा किंवा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही बीआयएसने दिली आहे.

बाजारात घबराट किंवा अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण करू नये; खात्री केल्याशिवाय कोणतीही अफवा पसरवू नये. घाऊक विक्रेते, उत्पादक किंवा पुरवठादारांकडून घेतलेल्या सोन्याची योग्य क्वालिटी कंट्रोल तपासणी करावी. केवळ हॉलमार्किंग केंद्राच्या प्रमाणपत्रावर विसंबून न राहता आवश्यकतेनुसार स्वतःच्या शोरूम व कार्यालयातही अतिरिक्त पडताळणी व पुनर्पडताळणी करावी. ग्राहकांना दागिने विकण्यापूर्वी बीआयएस केअर ॲपद्वारे हॉलमार्किंगची माहिती व सत्यता तपासावी, असे आवाहनही राजेश रोकडे यांनी केले.

ग्राहकांनीदेखील केवळ प्रतिष्ठित, विश्वासार्ह आणि दीर्घकाळ नावलौकिक राखलेल्या सराफा व्यावसायिकांकडूनच दागिने खरेदी करावेत. शहरातील स्थापित व विश्वासार्ह स्थानिक ज्वेलर्सना प्राधान्य द्यावे. प्रत्येक खरेदीवर जीएसटीसह पक्के बिल घ्यावे. कच्च्या पावतीवर किंवा बिलाशिवाय सोने खरेदी करणे टाळावे. दागिने घेताना हॉलमार्क व एचयूआयडी क्रमांक बीआयएस केअर ॲपवर तपासून खात्री करावी, असे आवाहन जीजेसीने केले आहे.