‘आपला दवाखाना’ झाला परका

Contributed by: प्रवीण लोणकरpravin.lonkar@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

‘गैरसोय होत आहे’

‘आपला दवाखाना’ झाला परका
सर्वांना मोफत उपचार मिळावा यासाठी आपला दवाखाना ही योजना सुरू करण्यात आली. अनेक गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र गेल्या २२ दिवसांपासून कंत्राटदारामार्फत चालविण्यात येणारे हे ३४ दवाखाने बंद आहेत. मोठ्या आशेने उपचार मिळावा यासाठी या दवाखान्यात येणाऱ्या अनेक रुग्णांना उपचाराअभावी परत जावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाकडून चालविण्यात येणारे २४ केंद्रे सुरू आहेत.

‘मटा’ने शहरातील वेगवेगळ्या भागांतील ‘आपला दवाखाना’ केंद्रांना भेट दिली असता ही केंद्रे बंद असल्याचे आढळून आले. नागपूर जिल्ह्यात ५८ ‘आपला दवाखाना’ केंद्र चालविले जातात. यापैकी ३४ केंद्रे कंत्राटदारामार्फत चालविलेली जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य सरकारने एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या कंपनीसोबत ही केंद्रे चालविण्याबाबत दहा वर्षांचा करार आहे. रुग्णांची प्राथमिक तपासणी, रुक्ततपासणी करून त्यांना मोफत औषधी दिली जात होती. कंत्राटदारामार्फत ही सेवा दिल्यानंतर राज्य शासन निधी देत होते.
एका केंद्राचा खर्च सुमारे चार लाखांच्या घरात आहे. राज्य सरकारकडून गेल्या दोन वर्षांपासून देयके मिळाली नसल्याने कंत्राटदार कंपनीने सेवा बंद केल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना बसत आहे. मोफत बाह्यरुग्ण सेवा आणि विविध वैद्यकीय तपासण्या बंद झाल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. केवळ योजना सुरू होऊन उपयोग नाही तर ती योजना चांगल्या पद्दतीने राबविण्याची हमी सरकारने देण्याची गरज रुग्णांकडून व्यक्त होत आहे. तर, प्रशासनानुसार, महापालिकेकडून ११३ आयुष्यमान आरोग्य मंदिर चालविले जातात. ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यासह मेयो, मेडिकल, डागा आणि जिल्हा रुग्णालयातही उपचार केले जात आहेत. कंत्राटदार कंपनीशी चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

हुडकेश्वर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती ‘आपला दवाखाना’ बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. हा दवाखाना तातडीने सुरू करून डॉक्टर, परिचारिका आणि औषधांची नियमित उपलब्धता करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक गोपाळ ईटनकर यांनी केली.