‘भारत माता की जय’ हेच संघकार्याचे सूत्र

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

प्रशिक्षण ही साधना

‘भारत माता की जय’ हेच संघकार्याचे सूत्र
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या जयजयकारासाठी नव्हे तर आयुष्यभर केवळ ‘भारत माता की जय’ या भावनेने कार्य करतात. तेच कार्याचे सूत्र आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांनी रविवारी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२ (विशेष) चा औपचारिक शुभारंभ रविवारी रेशीमबाग येथील स्मृतिभवन परिसरातील संत शिरोमणी रविदास सभागृहात झाला. यावेळी व्यासपीठावर तथा वर्गाचे पालक अधिकारी रामलालजी यांच्यासह सहसरकार्यवाह मुकुंदजी आणि वर्गाचे सर्वाधिकारी तथा छत्तीसगड प्रांत संघचालक डॉ. टोपलाल वर्मा उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन आणि संघटनमंत्राने वर्गाची सुरुवात करण्यात आली. हा वर्ग १६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. देशभरातून आलेले ५०० प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत.
वर्गात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना संघाची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता पुढे नवीन काय शिकायचे, असा प्रश्न मनात येऊ शकतो. मात्र, संघाचा वैचारिक गाभा अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी आणि त्यामध्ये प्रावीण्य संपादन करण्यासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाशी निगडित प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण केवळ औपचारिकता नसून ती एक प्रकारची साधना आहे, असेही करताना रामलालजी म्हणाले.