महायुतीत पेटली ठिणगी

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
conflict in mahayuti bjp shiv sena ready for election battle
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील मतभेद आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ‘महायुती’समोरच नवा पेच निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चिवटे यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे चर्चा करून ‘महायुती’तील उमेदवारीचा निर्णय घेतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

चिवटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री सामंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार ज्योती वाघमारे, आमदार राजेंद्र यड्रावकर, महेंद्र दळवी, सुहास बाबर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, रवींद्र धंगेकर, माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेनेनेही चिवटे यांना रिंगणात उतरविल्याने महायुतीतील जागावाटपाचा वाद आता उघड झाला आहे. यापूर्वीच उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. सचिन सानप यांनीही अर्ज दाखल केल्याने शिवसेनेसमोरच उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. आता चिवटे यांनी अधिकृत उमेदवारीसह मैदानात उतरत थेट भाजपच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे.
चिवटे यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सामंत यांनी पुढील २०-२२ दिवस मतदारांमध्ये जाऊन संवाद साधण्याचे आवाहन केले. मंगेश चिवटे जरी उमेदवार असला तरी प्रत्येक कार्यकर्त्याने ‘मीच मंगेश चिवटे आहे आणि मीच निवडून येणार आहे’, या भूमिकेत काम करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार झाल्यानंतरही चिवटे यांनी नम्रता कायम ठेवावी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उपलब्ध राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘रणनीतीची चर्चा नको’

निवडणुकीच्या पुढील टप्प्यात कार्यकर्त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून गैरसमज दूर करावेत, असे सांगतानाच निवडणुकीची रणनीती आणि अंतर्गत चर्चा गोपनीय ठेवण्याचा सल्ला सामंत यांनी दिला. भिंतीलाही कान असतात, असा सूचक इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. चिवटे यांनी उमेदवारी कायम ठेवली तर भाजप-शिवसेना अशी महायुतीतील थेट लढत होईल. दुसरीकडे, सानप यांची भूमिका काय राहणार, याकडेही लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत नऊ ऑक्टोबर असल्याने त्यापूर्वी महायुतीतील पडद्यामागील हालचालींना वेग येणार आहे.

मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असल्याचे स्पष्ट केले. महायुतीतील चर्चेत नागपूरची जागा ही भाजपला, अमरावतीची जागा शिवसेनेला, छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, तर पुणे पदवीधरची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाला होता. तर, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेचा निर्णय प्रलंबित होता. या ठिकाणी भाजप-शिवसेना दोघांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी व्यक्त केली.