Prepare Village wise Action Plan To Tackle Water Scarcity
पाणीटंचाईचा गावनिहाय आराखडा द्या
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांतील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व टप्प्यांचे वस्तुनिष्ठ आणि गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत,’ असा आदेश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी दिला. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ७५ ते ९९ टक्के प्रगती झालेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांतील पाणीपुरवठा योजना, भूजल पातळी आणि संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत पाटील बोलत होते.‘अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच आणि ग्रामपंचायतींशी चर्चा करून; तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे कृती आराखडे तयार करावेत. संभाव्य पाणीटंचाईच्या गावांची वस्तुस्थिती, जलस्रोत, पर्यायी व्यवस्था आणि उपाययोजना यांचा आराखड्यात स्पष्ट समावेश असावा,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘जिल्हा नियोजन समितीच्या दोन टक्के निधीच्या तरतुदीतून स्रोत बळकटीकरणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. विहीर पुनर्भरण, शेततळी, सिमेंट बंधारे, सिमेंट प्लग, सलग समतल चर आणि जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे करावीत. आवश्यक कामांसाठी जिल्हा नियोजन, खनिज आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही नियोजन करावे,’ असे ते म्हणाले.
वीजजोडणी वा रोहित्रांसंदर्भातील अडचणींबाबात संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा आणि या अडचणी लवकर सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.