प्रचार थंडावला; आता पोल मॅनेजर्सवर मदार!

Contributed by: नागपूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
प्रचार थंडावला; आता पोल मॅनेजर्सवर मदार!
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या १२ दिवसांपासून सभा, बैठका आणि मेळाव्यांच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार बुधवारी सायंकाळी थंडावला. मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून, आता उमेदवारांच्या पोल मॅनेजर्सकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे, दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी इतर उमेदवारांशी समन्वय साधणे, या रणनीतीला प्राधान्य दिले जाणार आहे.

पदवीधरच्या रिंगणात एकूण ३८ उमेदवार आहेत. मात्र, मुख्य लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेस चे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे, अपक्ष म्हणून लढत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे नितेश कराळे, शिक्षक भारतीचे अतुल देशमुख आणि सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी व अपक्ष उमेदवार संजय थूल हे प्रमुख उमेदवार आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांनी नंतर निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, मतपत्रिकेत त्यांचे नाव कायम आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता प्रत्यक्ष संपर्क, मतदान केंद्रांवरील नियोजन आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची यंत्रणा निर्णायक ठरणार आहे. पदवीधर मतदारसंघात मतदानाचे प्रमाण नेहमीच आव्हान ठरते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मतदारांची यादी, बूथनिहाय जबाबदाऱ्या, संपर्क मोहीम आणि वाहतूक व्यवस्थेवर सर्वच उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

प्रचारात भाजपने संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कोहळे यांच्यासाठी सभा, बैठका आणि मेळाव्यांतून मतदारांना साद घातली. पक्षयंत्रणा आणि नेत्यांच्या सक्रिय सहभागाच्या जोरावर भाजपने नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी प्रचाराची धुरा मोठ्या प्रमाणात स्वतःच्या खांद्यावर घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. स्वतः अभिजित वंजारी यांनी सहाही जिल्ह्यांत संपर्क साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपची संघटनात्मक ताकद विरुद्ध वंजारी यांची सहा वर्षांची कारकीर्द असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले कराळे, शिक्षक भारतीचे अतुल देशमुख आणि सतीश थूल किती मते घेतात, कुणाच्या मतांवर डल्ला मारतात, निवडणूक पहिल्या पसंतीच्या मतांवरच थांबते की दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतात, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सोले यांनी माघार घेतली असली तरी मतपत्रिकेत त्यांचे नाव कायम आहे. त्यांनी मतदारांना आपल्याला मत न देण्याचे आवाहन केले आहे. तरीही त्यांना मते मिळतील का आणि मिळाली तर ती कुणाची असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.