डिजिटल कोड धोक्यात

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
डिजिटल कोड धोक्यात
विविध कागदपत्रांच्या सत्यता पडताळणीसाठी उपयुक्त असणाऱ्या, विविध केवायसींसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक डिजिटल स्वाक्षऱ्या धोक्यात आल्या आहेत. यासाठी आवश्यक ‘डिजिटल सुरक्षा कोड’ सायबरचोरट्यांच्या हाती लागले आहेत.

सायबर-सुरक्षा निरीक्षक ‘सर्ट-इन’च्या मते, ‘भारतीय डिजिटल प्रमाणन प्राधिकरण’ अर्थात ‘ ई-मुद्रा ’चे डिजिटल प्रमाणपत्र सुरक्षा कोड धोक्यात आले आहेत. ही माहिती सायबरसुरक्षा निरीक्षण संस्था ‘सर्ट-इन’ने दिली आहे. या कोडचा उपयोग डिजिटल मत्तांचा पडताळा घेणे आणि ऑनलाइन डेटाचे प्रसारण करण्यासाठी होतो.
‘ई-मुद्रा’ ई-स्वाक्षरीचा पडताळा करून डिजिटल प्रमाणपत्र देते. हे प्राधिकरण जागतिक प्रमाणपत्र व्यवसायही चालवते. त्यामुळे डिजिटल प्रमाणपत्र सुरक्षा कोड धोक्यात येणे ही समस्या जागतिक व्यवसायात निर्माण झाली असली, तरी भारतावर होणारा परिणाम मर्यादित राहण्याची अपेक्षा आहे. ‘ई-मुद्रा’ डिजिटल स्वाक्षरीसाठी प्रमाणपत्रे जारी करते; जी सर्व प्रकारच्या व्यावसायिक संस्थांकडून अनेक ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाते.

‘ई-मुद्रा’ने सांगितले, की त्याच्या प्रणालीतील एका त्रुटीमुळे मूळ मजबूत कोडसमवेत कमकुवत कोडचा एक संच तयार झाला. एका संशोधकाने अ ॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मोझिलाला कळवले होते, की कमकुवत कोड शक्यतो एआय - सहाय्यित तंत्रांनी रिव्हर्स-इंजिनीअर केला जाऊ शकतील. मात्र, या ताज्या प्रकरणात ‘ई-मुद्राची पायाभूत सुविधा धोक्यात आली नाही, कोणत्याही डेटाचे उल्लंघन झाले नाही आणि कंपनीची सर्व भौतिक व तार्किक सुरक्षा नियंत्रणे अबाधित आहेत. गेल्या आठवड्यात, स्वायत्त ‘एआय’ एजंटांनी भारतीय संस्थांच्या लाइव्ह प्रणाली व गोपनीय डेटामध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश केला आहे, असा इशारा ‘सर्ट-इन’ने दिला होता. डिजिटल स्वाक्षरीचा उपयोग अनेक महत्त्वाचे दस्तावेज प्रमाणित करण्यासाठी, ‘केवायसी’ पूर्ण करण्यासाठी होत असल्यामुळे ‘ई-मुद्रा’च्या कोडवरील हा हल्ला चिंतेची बाब मानला जात आहे.