आई-वडिलांमधील सततच्या वादामुळे तणावात असलेल्या मुलाने जीवन संपविले. ही धक्कादायक घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पुलकित (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिकत होता. तो चांगला व्हॉलीबॉल पटूही होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलकितचे आई-वडील खासगी काम करतात. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. आई-वडिलांमधील तणावामुळे पुलकितही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहत होता. वडील वेळेवर पैसे देत नसल्याने त्याच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. आईच्या पगारावर मायलेकांचा उदरनिर्वाह सुरू होता, अशी माहिती आहे.वडील भेटायला टाळाटाळ करीत असल्याने तसेच शाळेतील पालकसभेलाही येत नसल्याने पुलकित निराश झाला होता. त्यामुळे तो कमी बोलू लागला होता. सोमवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने टोकाचे पाऊल उचलले. काही वेळाने आई घरी परतली असता घटना उघडकीस आली. तिच्या आरडाओरडीने शेजारी जमा झाले. एका शेजाऱ्याने सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १७ वर्षीय मुलासह दोघांनी जीवन संपविले. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात शतीराहन (वय १७) याने सोमवारी दुपारी टोकाचे पाऊल उचलले. त्याचे आई-वडील खासगी काम करतात. दुसरी घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग येथे घडली. अंशुल (वय २१) याने सोमवारी जीवन संपविले. दोन्ही घटनांचे कारण समजू शकले नाही. संबंधित पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.