२०१९ला तुम्हीच मतचोरी केली : शिंदे

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
२०१९ला तुम्हीच मतचोरी केली : शिंदे
‘२०१९च्या निवडणुकी दरम्यान महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले. मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीला भरभरून मतदान केले असतानाच तुम्ही महाविकास आघाडीबरोबर जाऊन खऱ्या अर्थाने व्होट चोरी केली. तुम्ही व्होट चोरी नव्हे तर मतांवर दरोडा टाकण्याचे काम केले आहे,’ अशी टीका शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दसऱ्या मेळाव्यात केली. त्याच वेळी राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले असून आरोप-प्रत्यारोपांत वेळ घालवण्यापेक्षा त्यांना मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड येथे झाला. त्या वेळी शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या ६० वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करून शिंदे यांनी यंदा शेतकरी संकटात असल्याकडे लक्ष वेधले. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना धीर द्यावा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे सांगून ‘भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’ या उपक्रमाची घोषणा त्यांनी केली.
रेजिम चेंजच्या प्रश्नावरून शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘राज्य करा किंवा उद्ध्वस्त करा, हे देशात चालणार नाही. तुम्हाला जनतेने तीन वेळा उखडून टाकले आहे, तुमच्या पक्षातील रेजिम बदलले तेही तुम्हाला कळले नाही.’ संविधान आणि आणीबाणीच्या गोष्टी करीत असल्याचे नमूद करीत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी घेतल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, की जरांगे हा बेईमान माणूस आहे. ‘तू उपोषणाला बसतोस आणि बाथरूममध्ये जाऊन गपचूप खातो. मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठे कुठे आहे. कुणाच्या नावावर आहे, कोणत्या नातेवाइकांच्या नावावर आहे, याची चौकशी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी करावी,’ अशी मागणी या वेळी कदम यांनी केली.