नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क सवलत जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही सवलत देण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे, त्यांना ते परत करण्याचेही निर्देश आहेत. शुल्कासंदर्भातील तक्रारींसाठी प्रत्येक महाविद्यालयात विशेष कक्ष स्थापन करून नोडल अधिकारी नेमण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठस्तरीय कृती समितीच्या अध्यक्ष अधिष्ठाता प्रा. कविता होले असून, सदस्यांमध्ये प्रा. कलापिनी अगस्ती, प्रा. हरेकृष्ण अगस्ती, प्रा. प्रसाद गोखले, कुलसचिव रोशन अलोणे, उपकुलसचिव डॉ. सुमित कठाळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी यांचा समावेश आहे.
‘सेट’ परीक्षा रविवारीनागपूर : प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट-२०२६ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे रविवार, २५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. नागपूर शहरातील २४ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, ९७२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी https:// setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना छायाचित्रयुक्त ओळखपत्र तपासले जाईल. संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संपर्क व्यक्ती डॉ. रविन जुगादे यांनी केले आहे.
‘किल्ले बनवा’ शनिवारी
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित खासदार शिव किल्ले स्पर्धेच्या अनुषंगाने शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी ‘किल्ले बनवा, इतिहास जागवा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील सेवासदन शाळेच्या भानुताई गडकरी स्मृती सभागृहात दुपारी ३ वाजता ही विनामूल्य कार्यशाळा होईल.