बाराशे कोटींचा ‘दसरा’

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नागपूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
transaction of 1200 crores on dussehra muhurat in nagpur
सव्वाशे कोटींची सुवर्णझळाळी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर जिल्ह्यात सुमारे बाराशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, गृहनिर्माण, ऑटोमोबाइल, रेडिमेड गारमेंट्स आणि फर्निचर क्षेत्रातही चांगली खरेदी झाली. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मुहूर्तावर सुमारे १०० किलो सोने, १२०० चारचाकी आणि ४ हजार दुचाकींची विक्री झाली.
विजयादशमीला गृहप्रवेश किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. विशेषतः सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदीही वाढली आहे. मंगळवारी नागपूरकरांनी मुहूर्तावर जोरदार खरेदी केली.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, लॅपटॉप आणि विविध गॅझेट्सना मागणी होती. झीरो डाउनपेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजदर आणि कर्जसुविधांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारात सवलतींचा वर्षाव होता. ग्राहकही गरज आणि बजेट लक्षात घेऊन खरेदी करताना दिसले.

फर्निचर क्षेत्रात सोफासेट, डायनिंग टेबल, टीपॉय, दिवाण, लाकडी मंदिर, कोठी, एल-शेप सोफा, महाराजा चेअर आणि सोफा-कम-बेड या वस्तूंना पसंती मिळाली. मुहूर्तावरील खरेदीमुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष डॉ. दीपेन अग्रवाल म्हणाले, ‘सराफा, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रांचा विचार करता नागपूर जिल्ह्यात सुमारे बाराशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात फटका बसला. अन्यथा हा आकडा अठराशे कोटी रुपयांच्या घरात गेला असता.’

सव्वाशे कोटींची सुवर्णझळाळी

सोन्याचे दर वाढले असले तरी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा ग्राहकांनी कायम ठेवली. जिल्ह्यात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची सोनेखरेदी झाल्याचा अंदाज आहे. दहा हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती होती. छोटे मंगळसूत्र, कानातले आदी दागिन्यांची खरेदी अधिक झाली, अशी माहिती ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली.

चारचाकी, दुचाकी सुसाट

विदर्भ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुज पांडे म्हणाले, ‘दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे १२०० चारचाकींची विक्री झाल्याचा अंदाज आहे.’ संघटनेचे उपाध्यक्ष आँचल गांधी म्हणाले, ‘जिल्ह्यात सुमारे ४ हजार दुचाकींची विक्री झाली. त्यापैकी सुमारे ८०० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री अपेक्षित आहे.’