मुंबई : सहामाही परीक्षा संपली, दिवाळीची सुट्टी सुरू झाली आणि सुट्टी संपताच पुन्हा परीक्षेची तयारी... इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित असलेले पॅट-१चे (संकलित मूल्यमापन चाचणी-१) वेळापत्रक अशाच पद्धतीचे असल्याने त्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत अभ्यासाच्या ताणापासून मुक्त ठेवण्यासाठी ‘पॅट’ नोव्हेंबरमध्ये न घेता ऑक्टोबरअखेर होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेसह घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांसह मुख्याध्यापक करीत आहेत.
दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची पॅट-१ चाचणी नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित आहे. त्यापूर्वी ऑक्टोबरअखेर शाळास्तरावर प्रथम सत्र परीक्षा होणार आहे.शिक्षक संघटनांनी याबाबत शिक्षण आयुक्त; तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे निवेदने देऊन ‘पॅट’च्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.