‘‘ एमपीएससी ’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटू नका. पुढील २४ तासांत राजीनामा झाला नाही, तर मुंबईत या. आपण सर्व एमपीएससी कार्यालयाच्या दारात आंदोलन करून, भीमनवार यांचा राजीनामा घेऊ,’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना केले.
एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलावर आंदोलन सुरू आहे. ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, खासदार संजय सिंह, अमोल कोल्हे, भास्कर भगरे, आमदार जयंत पाटील, रोहित पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, रोहिणी खडसे, अभिनेते किरण माने आदींनीही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या वेळी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमदार रोहित पवार आणि डॉ. विश्वजित पवार यांनी विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.ठाकरे म्हणाले, ‘निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार ही सगळी प्यादी आहेत. त्यांच्या मागे असलेल्या मोठ्या नेत्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. देशात आणि राज्यात हुकूमशाही पद्धतीने आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की त्यांना देशविरोधी, ‘अर्बन नक्षल’ ठरवले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे.’
आज खासगी आणि सरकारी क्षेत्रात पुरेशा नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा इतर राज्यांत जात आहेत. पुढील काळात रोजगाराच्या प्रश्नाचे गांभीर्य आणखी वाढणार आहे. त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठीही लढा उभारण्याची गरज आहे. पेपर, निवडणूक, कंपन्या आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर फूट पाडण्याचे प्रयत्न झाले; आता विद्यार्थ्यांची एकजूट फुटू देऊ नका. कोणत्याही पक्षाचे किंवा विचारांचे असा, निवडणुकीत कोणालाही मतदान करा; मात्र आंदोलनातील एकजूट कमी होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. एमपीएससी कार्यालयाच्या दारात जाऊन बसण्याची तयारी ठेवा. अधिकारी तुमच्या दारात आले नाहीत, तर तुम्ही त्यांच्या दारात जा. मुंबईतील आंदोलनाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, पवार यांनी विद्यार्थ्यांसह तिरडी आंदोलन केले.