पुणे : ‘एमपीएससी’ उमेदवारांच्या आंदोलनाचा फटका शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीला बसत असून, एस. एम. जोशी पूल , पत्रकार भवन, नवी पेठ आणि टिळक चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता गरवारे कॉलेज ते खंडुजीबाबा चौक या मार्गावरील वाहनांचा सरासरी वेग अवघा ५.३ किलोमीटर प्रतितास नोंदविला गेला. याच वेळेत सामान्य दिवसांत या मार्गावरील सरासरी वेग ११.४ किलोमीटर प्रतितास असतो.
वाहतूक पोलिसांनी तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान शहरातील वाहतूक स्थितीच्या केलेल्या विश्लेषणातून आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम एस. एम. जोशी पुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर झाल्याचे समोर आले. सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत या मार्गांवर वारंवार वाहतूक कोंडी झाली. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग ७.८ किलोमीटर प्रतितास झाला होता. या वेळेत सामान्यतः तो १३.४ किलोमीटर प्रतितास असतो. नवी पेठेतही आंदोलनाचा मोठा परिणाम जाणवला. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास परिसरातील सुमारे ८० टक्के रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली होती. त्या वेळी वाहनांचा सरासरी वेग ९.९ किलोमीटर प्रतितास नोंदविला गेला. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारासही नवी पेठेतील सुमारे ६० टक्के रस्ते वाहतूक दबावाखाली होते.खंडुजीबाबा चौक ते रूपाली हॉटेलदरम्यान शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री साडेअकरापर्यंत कायम होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी सुमारे सहा तास लागले. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी १० ते दुपारी १२ वाजून २० मिनिटे या कालावधीत एस. एम. जोशी पुलाच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती.
आंदोलनामुळे रविवारपर्यंत एस. एम. जोशी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. वाहतूक पोलिसांनी सोमवारी सकाळपासून पूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, आंदोलनाला सायंकाळी होणाऱ्या गर्दीमुळे आंदोलक बॅरिकेड लावून वाहतुकीसाठी पूल बंद करीत आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.